तरुणांनो, उद्योजक व्हा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांनो, उद्योजक व्हा!
तरुणांनो, उद्योजक व्हा!

तरुणांनो, उद्योजक व्हा!

sakal_logo
By

23490
कणकवली ः एम.एस.एम.ई. आयोजित सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवाचे शनिवारी उद्‍घाटन करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे.

तरुणांनो, उद्योजक व्हा!
---
नारायण राणे; कणकवलीत औद्योगिक महोत्सव सुरू
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २१ ः नोकरीच्या मागे न लागता उच्चशिक्षण घेऊन कोकणातील तरुणांनी उद्योग-व्यवसायात उतरावे. माझ्या एम.एस.एम.ई. खात्याच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, यासाठी प्रत्येकाने आत्मविश्वासाने पुढे यावे. कामात चिकाटी ठेवा, जिद्दीने उभे राहा. मी तुम्हाला सहकार्य करेन, असे आश्वासन केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज येथे दिले.
येथील एम.एस.एम.ई. आयोजित ‘सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव २०२२’चे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. येथील भाजप कार्यालयाच्या आवारात २३ मेपर्यंत प्रदर्शन सुरू आहे. या वेळी एम.एस.एम.ई.चे संचालक पी. एम. पार्लेवार, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, सावंतवाडी सहकारी उद्यमनगरचे अध्यक्ष श्रीकृष्ण काणेकर, चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष कमलकांत सावंत, मुकुल मेश्राम, डॉ. मिलिंद कुलकर्णी, सहसंचालक व्ही. आर. शिरसाट, राहुल मिश्रा, डी. आर. जोहरी उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील तरुण उद्योजक व्हावा, ही माझी इच्छा आहे. उद्योग क्षेत्रात प्रगती अथांग आहे. त्याचा फायदा घ्या. आसाममधून येणारे उद्योजक गवतापासून सेंट आणि अत्तर बनवत आहेत. केरळमधील लोक नारळाच्या किशीपासून वस्तू व प्लायवूडसुद्धा बनवतात. ते परदेशात पाठवतात. देशातील सर्वांत मोठे उद्योजक धीरूभाई अंबानी यांनी एक हजार ५०० रुपयांचे भांडवल घेऊन उद्योग सुरू केला आणि मृत्यूसमयी धीरूभाईंची रिलायन्स कंपनी ६३ हजार कोटींची उलाढाल करीत होती. त्यांचा आदर्श घ्या. यापूर्वी जिल्ह्यात ७२ अधिकारी आणले. २०० कोटींचे आधुनिक उद्योग प्रशिक्षण केंद्र जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे. नोकरीच हवी, मग ती शिपाईपदाची असली तरी चालेल, ही मानसिकता सोडा. डाळ, पिठी-भात खाऊन समाधान मानू नका. देशात करोडो रुपयांची उलाढाल होते. त्या उद्योग क्षेत्रात तुम्ही कधीतरी असणार आहेत की नाही?’’
ते म्हणाले, ‘‘कोकणी, मराठी माणसाने आत्मविश्वास बाळगावा. १५ ते २० कोटींचा आपला उद्योग असावा, अशी जिद्द बाळगावी. येथे गरे, आंबा, कोकम आहेत. त्यावर काय प्रक्रिया करू शकता, हे ठरवा. नवीन निर्मितीची क्षमता ठेवा.’’
श्री. पार्लेवार म्हणाले, ‘‘आज २५० नवउद्योजकांना निधी वाटप केला जाणार आहे. सिंधुदुर्गात नवे उद्योग उभे राहत आहेत, हे त्याचे उदाहरण आहे.’’ श्री. काणेकर म्हणाले, ‘‘श्री. राणे यांच्यामुळेच येथील सहकारी उद्यमासाठी खास योजना राबविली जात आहे. ‘एमएसएमई’चे अधिकारी पाठपुरावा करून येथील उद्योजकांना प्रोत्साहन देत आहेत.’’ सावंत म्हणाले, ‘‘मी १९५८ मध्ये मुंबई सोडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो. मात्र, विकासाला जी गती हवी होती, ती मिळाली नाही. आता बदल होत आहे. जेव्हा आम्ही उद्योग करायला सुरुवात केली, तेव्हा दोन लाख बँक कर्ज मिळत नव्हते. मात्र, आता परिस्थिती बदली आहे. श्री. राणे यांच्यामुळे बँक कर्ज आणि सर्व प्रकरणी लायसन्स दारात उपलब्ध आहेत. आता बाजारपेठेचाही प्रश्न सुटला आहे. या संधीचा फायदा घ्या. नोकरीच्या मागे धावू नका, उद्योजक व्हा.’’

३०७ उद्योजकांना १७ कोटींचा निधी
कार्यक्रमात जिल्ह्यातील ३०७ उद्योजकांना १७ कोटींचे वाटप करण्यात आले. या वेळी बँक ऑफ इंडियाने १५६ जणांना सहा कोटी १४ लाख, बँक ऑफ महाराष्ट्रने दोन कोटी १२ लाख, युनियन बँकेने एक कोटी ५३ लाख, बँक ऑफ बडोदाने एक कोटी ५३ लाख, कॅनरा बँकेने ८५ लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाने दोन कोटी ५० लाख असे एकूण ३०७ नव्या उद्योजकांना १७ कोटी रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60394 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..