महापुराची व्याप्ती तीन वर्षापासून वाढती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापुराची व्याप्ती तीन वर्षापासून वाढती
महापुराची व्याप्ती तीन वर्षापासून वाढती

महापुराची व्याप्ती तीन वर्षापासून वाढती

sakal_logo
By

लोगो : कोवाड महापुराच्या छायेत भाग - २

महापुराची व्याप्ती तीन वर्षांपासून वाढती
उच्चांक गाठला; पूर ओसरण्याच्या मंदगतीने धोका अधिक
अशोक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ३१ : दरवर्षी येथे महापूर येतो. त्याची एक विशिष्ट मर्यादा होती. त्यानुसार येथील शेतकरी व व्यापारी वर्गाने तसे आपल्या शेतीत व व्यवसायात बदल केले आहेत; पण गेल्या तीन वर्षांपासून महापुराने रौद्र रूप धारण केले आहे. पाण्याच्या पातळीने उच्चांक गाठला. त्यामुळे येथील शेतकरी व व्यापारी वर्गाची सर्वच व्यवसायाची गणिते व अंदाज फोल ठरले आहेत. एका बाजूला महापुराची व्याप्ती वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला पूर ओसरण्याची गती मंद आहे. पुराच्या पाण्याला येत असलेली तुंब ही अधिक घातक ठरत आहे.
पूर ओसरायला सात ते आठ दिवस लागत असल्याने पुरात बुडालेली पिके कुजून जात आहेत. पाण्यात बुडालेल्या दुकानांतील माल व फर्निचरचे नुकसान होत आहे. इमारतींना तडे जात आहेत. या सर्वांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास होण्याची गरज आहे. नुकसान भरपाई ही तात्पुरती मलमपट्टी आहे. त्यामुळे महापुराच्या खोलवर रुजलेल्या खुणा कमी होणार नाहीत. पूर आला की, नदीपात्रातील कारणांवर चर्चा रंगते; मात्र त्याबरोबरच शासकीय धोरण, हवामान, नदी खोरे, लोकजीवन, शेती, व्यापार अशा अनेक अंगांनी पुराचा अभ्यास करून उपाययोजना तयार कराव्या लागतील. महापुराच्या काळात नदीला जंगमहट्टी किंवा जांबरे तलावातील पाणी सोडले जाते, अशीही चर्चा असते; पण नदीपात्रातील बांधकामापासून ते ओढ्या- नाल्यांचे बदललेले मार्ग, ठिकठिकाणी टाकलेले भराव, नदीत वाढत असलेला गाळ पुराला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. नदीमुळे पूर येतो हे बरोबर असले तरी मानवी हस्तक्षेपामुळे पुराचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. याचे भान असले पाहिजे. मानवी हस्तक्षेप अर्थकारणातून होतो. नदी क्षेत्रात बांधकामे, ओढ्यांचे, नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलले. याला आजपर्यंत आळा घातला गेला नाही. यापूर्वी हे चालले; पण आता बदलत असलेले हवामान, ढगफुटी, तीव्र वादळे, जोरदार पडणारा पाऊस यामुळे महापुराचे संकट वाढत जाणारे आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणेसह सर्वांनी यावर उपाययोजनेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पुराची जबाबदारी केवळ आपत्ती निवारणाची नाही. केंद्र सरकार व राज्य सरकार यांचीही आहे. यामध्ये व्यापारी, ग्रामपंचायत, नागरिक व शेतकरी यांचीही भूमिका महत्त्वाची आहे.
-----------------
हे करायला हवे
- नदीपात्रात वाढत असलेला हस्तक्षेप रोखावा
- ओढ्यांत व नदीकाठावर घनकचरा टाकण्याला बंदी हवी
- अतिवृष्टीचा इशारा देणारी यंत्रणा बसविणे
- नदीपात्रात येणारे अडथळे दूर करणे
- पुरापूर्वी प्रकल्प, तलावांची पाण्याची पातळी कमी ठेवणे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60517 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top