
अंबाबाईला गर्दी
23694
साडेतीन लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
तीन दिवस शहर गजबजले ; मंदिर परिसरात मोठी रांग; ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
कोल्हापूर, ता. २२ ः पावसाला सुरुवात होण्यापूर्वी भटकंती करून घेण्यासाठी बाहेर पडलेले पर्यटक दाखल झाल्याने शहर गजबजून गेले. तीन दिवसात साडेतीन लाखांवर भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. रविवारी दीड लाखावर भाविकांनी दर्शन घेतले. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठी रांग लागली. महाद्वार रोड, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोडवर भाविकच दिसत होते. बहुतांश रस्त्यावर त्यांच्याच वाहनांची रांग होती. दिवसभर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र होते. शनिवारीही सव्वा लाखावर भाविकांनी दर्शन घेतले. गेल्या आठवड्यात शनिवार, रविवारला जोडून आलेल्या सुट्यांमुळे गर्दी झाली होती. आता सुटीचा शेवटचा टप्पा सुरू असून, पावसाला लवकर सुरू होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शुक्रवारपासूनच भाविकांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यादिवशी दिवसभरात ६९ हजार ८७० जणांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यादिवशी सुरू असलेला पाऊस व त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेले असतानाही भाविक शहरात फिरत होते.
दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी भाविकांची संख्या दुप्पट झाली. त्यादिवशी सव्वा लाखावर तर रविवारी तब्बल दीड लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. यामुळे मंदिर परिसर फुलून गेला होता. दोन्ही दिवस पर्यटकांची वाहने मोठ्या संख्येने दिसत होती. बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, कॉमर्स कॉलेज रोड, शिवाजी स्टेडियम परिसर, टेंबे रोड, केशवराव भोसले नाट्यगृह परिसर, दैवज्ञ बोर्डिंग रोड येथे वाहने लावली होती. तिथे वाहनांची गर्दी होऊ लागल्यानंतर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अनेकांना दसरा चौकात वाहने लावण्यास सांगितले. अंबाबाई, तुळजाभवानीचे दर्शन घेऊन पर्यटक जोतिबा, पन्हाळ्याला गेले. सायंकाळी रंकाळा परिसरात गर्दी झाली होती.
पोलिसांकडून मार्गदर्शन
पर्यटकांची वाहने सकाळपासून मोठ्या संख्येने मंदिराच्या दिशेने येत असल्याने शहर वाहतूक शाखेचे पोलिस विविध चौकांत तैनात केले होते. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, दसरा चौक येथे पर्यटकांना पोलिसांकडून वाहने पार्किंगबाबत सूचना दिल्या जात होत्या.
--
तीन दिवसांतील भाविक असे
*शुक्रवारी - ६९,८७०
*शनिवारी - १,२७,९०१
*रविवारी - १,५३,२८४
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60576 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..