
दाभोळ : आता ‘डीप’ करा; कोकम सरबत बनवा
दाभोळ - कोकण कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी कोकम सरबत डीप बॅग बनवली आहे. व्यापारीदृष्ट्या लवकरच या बॅग उत्तम ‘सॅचेट’मधून बाजारात येणार आहेत. याबाबतचे पेटंट कृषी विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. कोकम सरबत डीप बॅग बनविण्याचे हे तंत्र ज्यांना हवे असेल त्यांना ते देण्यास विद्यापीठ तयार आहे.
‘डीप टी’प्रमाणे कोकम सरबताची ही बॅग पाण्यात बुडवायची आणि त्यात साखर टाकली की उत्तम दर्जाचे कोकम सरबत तयार होते. गुणवत्तेच्या सर्व निकषांना हे खरे उतरले आहे. कोकण कृषी विद्यापीठात नुकताच सुवर्णपालवी महोत्सव झाला. त्यावेळी या कोकम सरबत डीप बॅगचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था रोहा (जि. रायगड) येथील प्रा. व प्रमुख डॉ. प्रदीप रेळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोकम सरबत डीप बॅग तयार करण्याचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले. याचे पेटंट कोकण कृषी विद्यापीठाचे पहिलेच पेटंट आहे. या संशोधन कार्यात डॉ. प्रदीप रेळेकर यांना ललित खापरे व प्रशांत देबाजे, डॉ. केशव पुजारी यांनी सहकार्य केले. २०१७ पासून पाच वर्षे पेटंट मिळविण्यात गेली. त्यासाठीच्या सर्व निकषांस या बॅग पात्र ठरल्या आहेत.
या तंत्रात कोकम सालीचा रस काढून घेतल्यावर शिल्लक राहिलेल्या भागाची पावडर बनविण्यात येते. ती एकात एक अशा दोन फिल्टर बॅगमध्ये भरली जाते. या पावडरमध्ये योग्य मीठ व जिऱ्याचा स्वादही मिसळला जातो. उत्तम सॅचेटमध्ये ते देण्यात येणार आहे. एक कोकम सरबत डीप बॅग दीड मिनिटांपर्यंत १३५ मिलीलिटर पाण्यात बुडवायची आणि पळून घ्यायची. त्यानंतर सरबताला सुंदर रंग व स्वाद येतो. त्यात जरुरीपुरती साखर घालायची. त्यासाठी आवश्यक ती साखर सॅचेटमधूनही दिली जाणार आहे. सॅचेटविना कोकम डीप बॅग दिली, तर त्याच्या स्वादावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र सॅचेटमधून ती दिल्यामुळे त्याच्या स्वादावर कोणताही परिणाम होत नाही. लवकरच कोकण कृषी विद्यापीठ व्यावसायिकदृष्ट्या याचे उत्पादन करणार आहे.
अशी आहे पारंपरिक पद्धत
पिकलेल्या कोकम फळाच्या सालीचा उपयोग प्रामुख्याने कोकम सिरप करण्यासाठी केला जातो. कोकम सिरप तयार करण्यासाठी कोकम सालीत एकास दोन या प्रमाणात साखर मिसळून ठेवल्यावर १० ते १२ दिवसांत सालीतील रसात साखर विरघळून कोकम सिरप तयार होते. आणि त्यानंतर सिरपमध्ये एकास पाच प्रमाणात पाणी मिसळून पारंपरिक पद्धतीने कोकम सरबत तयार केले जाते.
आरोग्याला लाभदायक
कोकम हे कोकणातील औषधी गुणधर्म असेलेले बहुपयोगी फळ आम्लपित्त नाशकही आहे. रसामधील हायड्राँक्सी सायट्रिक आम्लामुळे ते लठ्ठपणा कमी करण्यासाठी तसेच पचन संबंधित समस्या सोडविण्यास मदत करते. कोकम सरबतामध्ये शरीराला थंडावा देण्याचे गुणही असतात.
ही आहेत वैशिष्ट्ये
* कोकमच्या सालीचाही किफायतशीर उपयोग
* चोथा न टाकता गुणवत्तापूर्ण सरबतासाठी उपयोग
* प्रवासात सहज वापरता येणारे, तयार करण्यास सोपे
* विमान, रेल्वेसेवा यांसह मोठ्या आस्थापनांत वापर शक्य
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60599 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..