
रत्नागिरी-पोलिसात नोकरी मिळवली फसवणूक करून
४०-४
डमी बसवून मिळविली पोलिसात नोकरी
रत्नागिरीतील प्रकारात दोघाना अटक; संशयित नांदेड, औरंगाबादमधील
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः पोलिस दलातील २०२१ च्या चालक पोलिस शिपाई भरतीत डमी उमेदवार बसवून नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केल्याचे रत्नागिरीत उघड झाले आहे. यातील तिघेही संशयित नांदेड व औरंगाबाद येथील आहेत. या प्रकरणातील दोघा संशयितांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गजानन दत्ता चाकोते (वय २९, रा. माळकेल्हारी पो. बेल्लारी ता. किनवट, जि. नांदेड), पद्मसिंग पूनमसिंग बमनावत (राजपूत) (वय २५, रा. टाकळेवाडी, ता. गंगापूर जि. औरंगाबाद), आणखी एक डमी उमेदवार, असे संशयित आहेत. हा प्रकार १३ ऑक्टोबर २०२१ च्या परीक्षेवेळी घडला. या प्रकरणी १८ मे २०२२ ला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन चाकोते याने २०१९ च्या चालक पोलिस शिपाई पदासाठी १३ ऑक्टोबर २०२१ ला झालेल्या लेखी परीक्षेस स्वतःच्या जागी डमी उमेदवार बसवला. त्यासाठी संशयित पद्मसिंग बमनावत यांच्याशी ७ लाख ५० हजार रुपयांचा व्यवहार केला. लेखी परीक्षेला डमी उमेदवार बसवून तो पास झाला. डमी उमेदवाराने परीक्षेवेळी हजेरीपट व उत्तरपत्रिका यावर संशयित गजानन चाकोते यांच्या सहीसारखी हुबेहूब सही केली. अन् चाकोते याला रत्नागिरी जिल्हा पोलिसदलात नोकरी मिळाली. गजानन चाकोते हा रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर चालक पोलिस शिपाई या पदावर भरती झाला. तो पोलिस मुख्यालय, रत्नागिरी येथे मूलभूत प्रशिक्षण घेत असून त्याचे वागणे संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्याकडे केलेल्या गोपनीय चौकशीमध्ये त्याच्याऐवजी दुसरा डमी लेखी परीक्षेला बसवून भरती झाल्याची कबुली दिली.
या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी फिर्याद दिली. पोलिसानी औरंगाबाद येथे जाऊन पद्मसिंग बमनावत-राजपूत यास अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना चाकोते आणि पद्मसिंग राजपूत यानी संशयित डमी उमेदवार यास ६ लाख रुपये दिल्याचे सांगितले. चाकोते याच्या ओळखीचा रणजित बजरंग गोमसाडू (रा. औरंगाबाद) हा परीक्षेला बसला असे दोघांनी सांगितले मात्र याची निश्चिती झालेली नाही. संशयित असमाधानकारक उत्तरे देत आहेत. दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
चौकट
याआधीही फसवणूक
औरंगाबाद येथे जाऊन पद्मसिंग बमनावत -राजपूत यास रत्नागिरी पोलिसानी अटक केली. औरंगाबाद शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पद्मसिंग बसनावत याच्यावर यापूर्वी पिंपरी चिंचवड, हिजवडी, नागपूर व पालघर या ठिकाणी अशाच प्रकारे शासनाची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60921 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..