पूर नियंत्रण उपाययोजनांसाठी भाजप मोर्च काढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर नियंत्रण उपाययोजनांसाठी भाजप मोर्च काढणार
पूर नियंत्रण उपाययोजनांसाठी भाजप मोर्च काढणार

पूर नियंत्रण उपाययोजनांसाठी भाजप मोर्च काढणार

sakal_logo
By

२३९६७

पूरनियंत्रण उपाययोजनांसाठी मोर्चा
भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील; ३० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर देणार धडक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः जिल्ह्यात लागोपाठ दोन वर्षे महापूर आला. त्यामध्ये हजारो कुटुंबांचे नुकसान झाले. एवढे नुकसान होऊनही प्रशासनाने पूरनियंत्रणासाठी फारशा उपाययोजना केल्या नाहीत. प्रशासनावर दबाव आणल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही. म्हणून पूरनियंत्रणाच्या उपाययोजना तातडीने करा या मागणीसाठी ३० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. पूरग्रस्त नागरिक, आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शिरोळ, हातकणंगले भागातील पूरग्रस्तांनी भूमिका मांडली.
माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, ‘‘सांगली फाटा ते पंचगंगा पूल या मार्गावर उड्‍डाण पुलामुळे पुराचा धोका वाढतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्‍याची मागणी केली पाहिजे. पूरग्रस्त नागरिकांना पूर येण्यापूर्वीच स्थलांतरित करून त्यांची चांगली व्यवस्था केली पाहिजे.’’
माजी नगरसेवक सत्‍यजित कदम म्‍हणाले, ‘‘सांगली फाटा ते पंचगंगा पूल या मार्गासह अनेक ठिकाणी रस्‍त्‍याच्‍या भरावामुळे पूरस्‍थिती निर्माण होते. त्‍यावर उपाय म्‍हणून सहा पदरीकरणात तरतूद केली आहे.’’
माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘महामार्गाची उंची वाढवणे किंवा तेथे पूल करणे या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठकीचे आयोजन करणे आवश्यक आहे. या संदर्भात कायमस्वरुपी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याची निश्चिती करून त्याचाही पाठपुरावा केला पाहिजे.’’
पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड म्हणाले, ‘‘नदीमध्ये असणारे बंधारे, पुलांच्या गाळ्यांची रचना, राधानगरी धरणाचे दरवाजे, नदी पात्रातील अतिक्रमण, या बाबींचा विचार करण्याची गरज आहे. शहरातील नाले, ओढे यांच्यामुळेही काही भागात पूरस्थिती निर्माण होते. शहरातील १६ पैकी १४ नाल्‍यांवर इमारती बांध‍ल्या आहेत. त्यामुळे शहरातही पुराचा धोका वाढला आहे.’’
बंडा साळोखे, बाबा इंदुलकर, भगवान काटे, युवा मोर्चाचे संदीप देसाई, मुरलीधर जाधव यांच्‍यासह पूरग्रस्‍त भागातील नागरिकांनी व्‍यथा मांडून सूचना केल्‍या. बैठकीस माजी आमदार अमल महाडिक, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, माजी महापौर सुनील कदम, अशोक देसाई, गायत्री देसाई उपस्‍थित होते.

शिरोळवासीयांनी
मांडल्या व्यथा
भाजपच्या शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तेथील पूरस्थितीचे प्रश्न मांडले. नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यासाठी बोटी अपुऱ्या आहेत. गुरांना पुरेसा चारा मिळत नाही. काही पूरग्रस्तांच्या छावण्यांमध्ये शिळे अन्न दिले गेले, यासाठी आता शासनाबरोबरच पक्षीय पातळीवरही प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60999 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..