
शिक्षण शुल्क सवलतीचा अंमल राज्यभर करावा
24308
गडहिंग्लज : शिक्षण शुल्क सवलतीची अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदन बाबासाहेब वाघमोडे यांना देताना विविध संघटनांचे प्रतिनिधी.
शिक्षण शुल्क सवलतीचा
अंमल राज्यभर करावा
---
गडहिंग्लजला संघटनांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : राज्यातील मेट्रो सिटीमध्ये विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे शुल्क १५ टक्क्यांनी कमी केले असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या धर्तीवरच संपूर्ण राज्यभर या सवलतीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केली आहे.
यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की दोन वर्षे कोरोना महामारीने अनेक लोक संकटात आहेत. आजही आर्थिक क्षेत्रात त्याचे परिणाम जाणवत आहेत. याचा विचार करून शासनाने मुंबई, पुणे, नागपूर अशा मेट्रोसिटीत विनाअनुदानित शाळांचे शुल्क १५ टक्क्यांनी कमी केले आहेत. शासनाचा हा निर्णय पक्षपातीपणाचा आहे. बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात आहे. कोरोनाचे विपरीत परिणाम शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक झाले. यामुळे तालुका आणि ग्रामीण भागात असणाऱ्या हजारो पटीतील इंग्रजी शाळांचे शुल्क भरणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. परंतु, शुल्कात सवलत देताना शासनाने केवळ मेट्रो सिटीतील शाळांसंदर्भात दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेवर अन्याय होतो, हा दुजाभाव निषेधार्ह आहे. शासनाने आता या निर्णयाची अंमलबजावणी सरसकट राज्यासाठी करावी. पंधरा दिवसांत हा निर्णय न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष परशुराम कांबळे, प्रकाश कांबळे, रिपाइंचे शिवाजी कांबळे, कल्पना कांबळे, ईश्वर कांबळे, रमेश शिंगे, भीमा बालेशगोळ यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61458 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..