
आजऱ्यात सात जणावर ९८ गावांच्या शेतीचा भार
आजऱ्यात सात जणांवर
९८ गावांच्या शेतीचा भार
कृषी सहायकांची १७ पदे रिक्त; अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत
रणजित कालेकर : सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २५ : आजरा तालुक्यामधील कृषी विभागाकडील बहुतांश पदे रिक्त आहेत. यामध्ये मुख्यतः ग्रामस्तरावर काम करणारे कृषी सहायकाची १७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सात जणांवर तालुक्यातील ९८ गावांच्या शेतीचा भार पडला आहे. प्रत्येकाकडे बारा ते पंधरा गावे सांभाळण्याची जबाबदारी आली असून, त्यांची चांगलीच धावपळ होत आहे. कर्मचारी नसल्यामुळे दैनंदिन कार्यालयीन कामाबरोबर अन्य कामांवरही परिणाम होत आहे. अधिकाऱ्यांना अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यालयीन कामे व अन्य कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आजरा तालुक्यात कृषी विभागाकडे एक तालुका कृषी अधिकारी, दोन मंडल कृषी अधिकारी, एक कार्यालयीन कृषी अधिकारी, पाच पर्यवेक्षक (यामध्ये एक कार्यालयीन चार क्षेत्रीय) कृषी सहायक पदे एकूण २५ इतकी आहेत. (यामध्ये एक कार्यलयीन व २४ क्षेत्रीय पदे) आहेत. वरिष्ठ लिपिक एक, कनिष्ठ लिपिक ३, शिपाई ४ पदे अशी ४२ पदे आहेत. सध्या तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कार्यालयीन कृषी अधिकारी, पाच पर्यवेक्षक, सात कृषी सहायक, वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक ३, शिपाई २ अशी २० जण सध्या कार्यरत आहेत. कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी हा स्टाफ पुरेसा आहे; पण क्षेत्रीय कर्मचारी हे कमी आहेत. त्यामुळे ग्रामस्तरावर काम करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. आजरा तालुक्यात ९८ गावे असून, पिकाखालील क्षेत्र २२ हजार हेक्टर इतके आहे. यामध्ये मुख्य पीक भाताचे ९७००, नागलीचे ३५००, उसाचे ४७००, भुईमूग ३००० हेक्टर इतके आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन बी- बियाणे, बिजप्रक्रिया, लागवड, मशागत यासह विविध गोष्टींबाबत मार्गदर्शन करताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मर्यादा येत आहेत. या विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, हंगाम व पीकनिहाय माहिती देणे, शेती शाळा घेणे, प्रात्यक्षिक घेणे, विविध योनजांचा प्रचार प्रसिध्दी व अंमलबजावणी करणे. ऑनलाईन पध्दतीने यांत्रिकीकरणासह शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देणे, मोका तपासणी करणे, कृषी उद्योगाचे लाभार्थीना भेटून पूर्व मोका तपासणी करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, कृषी सप्ताहाची तयारी करणे यासह विविध कामे करताना अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. कामाचा ताण वाढल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानसिक व शारीरिक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. ९८ गावांच्या शेतीचा भार अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सांभाळताना नाकीनऊ आले आहे. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. या हंगामाबाबत प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे कठीण बनले आहे. त्यामुळे या विभागातील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांतूनही होत आहे.
-------------
चौकट
नावीन्यपूर्ण योजनांवर मर्यादा
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, स्मार्ट योजना यासह घनसाळ, अन्य देशीवाण योजना, प्रयोगशील शेती या नावीन्यपूर्ण योजना राबविताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मर्यादा येत आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी वंचित राहात आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61483 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..