
कारागृहात विठुरायाचे दर्शन
24383
कोल्हापूर ः स्पर्धेप्रसंगी कारागृह निरीक्षक जयवंत भोसले, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धाप्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, कोल्हापूर जिल्हाप्रमुख पांडुरंग गजगेश्र्वर, अच्युत महाराज कुलकर्णी, विश्वस्त विवेक थिटे, संजीव मिसाळ, शंकर धुमाळ आदी.
कारागृहातच घडले विठुरायाचे दर्शन...!
बिंदू चौक सबजेलमधील बंदिजनांच्या भावना; शरद क्रीडा, सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे भजन-अभंग स्पर्धा
कोल्हापूर, ता. २५ ः बंदिजनांसाठी जगत्गुरू तुकोबारायांच्या नावाने कारागृहात स्पर्धा घेतल्या. स्पर्धेत आम्हाला सहभागी होता आले. यामुळे कारागृहातच विठुरायाचे दर्शन झाल्याची प्रचिती मिळाली, अशा भावना बिंदू चौक सबजेलमधील बंदिजनांनी व्यक्त केल्या. संत रचनांनंतर ‘माणूस होऊन राहिन मी’ या सादर केलेल्या स्वरचित भजनाने भावनिकतेचा कळस गाठला.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त कारागृहातील बंदिजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धाचे आयोजन केले.
आज सबजेलमधील बंदिजनांनी सादरीकरण करीत उपस्थितांची वाहवा मिळविली. कारागृह निरीक्षक जयवंत भोसले, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धाप्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, जिल्हाप्रमुख पांडुरंग गजगेश्र्वर, अच्युत महाराज कुलकर्णी, विश्वस्त विवेक थिटे, संजीव मिसाळ, शंकर धुमाळ आदी उपस्थित होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी’ या अभंगाच्या सादरीकरणाने स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर संत एकनाथ महाराजांचा ‘ज्या सुखा कारणे देव वेडावला’ आणि अखेरीस संत तुकाराम महाराज यांचा ‘कुठे शोधू जीवाला विसावा’ हा अभंग सादर केला. बंदिजनांनी एक स्वरचित रचना सादर करावी, अशीही स्पर्धेची एक अट होती. याला अनुसरून ‘माणूस होऊन राहीन मी, व्यसनाचा नाद आयुष्य बरबाद करी, वाईटाची साथ नको आता’ ही समाजप्रबोधनपर रचना सादर केले.
स्पर्धेमुळे बंदिजनांत भक्तीरस वाढीस लागून अध्यात्माच्या माध्यमातून चांगले विचार रुजायला आणि त्यांची जडणघडण व्हायला उपयोग होईल. कारागृहातून बंदिजन बाहेर गेल्यानंतर आयुष्याची भविष्यातील वाटचाल चांगल्या मार्गाने करतील. बंदिजनांत निश्चितच सुधारणा होईल.
- जयवंत भोसले, कारागृह निरीक्षक.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61524 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..