
शैक्षणिक संस्था चालकांची मुंबईत बैठक
24442
शिक्षण संस्थांच्या समस्यांबाबत सकारात्मक
उपमुख्यमंत्री अजित पवार; खासगी शिक्षण संस्था चालकांनी मांडल्या अडचणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः ‘‘राज्यातील खासगी शिक्षण संस्थांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या समस्यांची जाणीव राज्य सरकारला असून त्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून समस्यांचे निराकरण केले जाईल. पुढील पाच वर्षांत आणखी गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती पावले सरकारकडून उचलली जातील,’’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील खासगी शिक्षण संस्थांच्या प्रमुखांची बैठक झाली, तीमध्ये पवार बोलत होते. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली.
सुरवातीला शिक्षण संस्थांच्या संचालकांनी प्रश्न मांडले. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी खासगी शैक्षणिक संस्थांसमोरील अडचणी व समस्यांबाबत प्रेझेन्टेशन दिले. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘राज्याच्या विकासात शैक्षणिक संस्थांचे योगदान मोठे आहे. कौशल्याधिष्ठित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यामध्ये या संस्थांचा मोठा वाटा आहे. संस्थांच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून प्रश्नांची सोडवणूक करू. पुढील पाच वर्षांत आणखी गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती पावले सरकारकडून उचलली जातील.’’
बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादाजी भुसे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह राज्यातील विविध खासगी शिक्षण संस्थांचे संचालक, पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61638 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..