
इलेक्ट्रीक वाहनांत अनधिकृत बदल
ई बाईक्स फोटो
इलेक्ट्रीक वाहनात बदल करून विक्री
राज्यात तपासणी मोहीम; अधिकृत विक्रेत्याकडून खरेदीचे परिवहन आयुक्तांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : वाहन उत्पादक, वितरक व नागरिकांनी इलेक्ट्रीक वाहनांमध्ये अनधिकृत बदल करू नयेत व अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते पूर्ववत करावेत, असे आवाहन परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी केले आहे. अशा वाहनांची तसेच अशी वाहने उत्पादित करणारे उत्पादक व वितरकांविरुद्घ विशेष तपासणी मोहीम सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
बॅटरी ऑपरेटेड व्हेईकलची व्याख्या दिली असून त्यानुसार २५० वॉटपेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच ज्या वाहनांची वेगमर्यादा ताशी २५ किलोमीटरपेक्षा कमी आहे, अशा ई-बाईक्सना नोंदणीपासून सूट आहे. काही वाहन उत्पादक मान्यताप्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-बाईक्सची विक्री करतात. ज्या ई-बाईक्सना वाहन उत्पादन करण्याची मान्यता मिळाली आहे, अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून अशा वाहनांची बॅटरी क्षमता २५० वॉटपेक्षा जास्त करतात अथवा वाहनांची वेगमर्यादा ताशी २५ किलोमीटरपेक्षा अधिकची करतात. वास्तविक अशा वाहनांना नोंदणी आवश्यक नसल्यामुळे त्यांना वाहन चालक अनुज्ञप्तीची देखील आवश्यकता नाही. यामुळे अशा प्रकारे बेकायदेशीर बदल करून वाहन विक्री केल्यास रस्ता सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ई-बाईक्सना आग लागून अपघाताच्या घटना वारंवार निदर्शनास आल्या आहेत. अशा संबंधित वाहन उत्पादक, वाहन वितरक व वाहनधारक यांच्याविरुध्द मोटार वाहन कायदा १९८८ तसेच भारतीय दंड संहितेअंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याच्या सूचना सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मानकाची खात्री करा
प्राधिकृत संस्थेने मान्यता दिलेल्या मानकाप्रमाणे वाहन असल्याची खातरजमा करावी. अशी वाहने खरेदी करण्यापूर्वी संबंधित वाहन वितरक व उत्पादकांकडे मान्यताप्राप्त संस्थेचा टाईप ॲप्रोव्हल टेस्ट रिपोर्ट व परिवहन आयुक्त कार्यालय यांनी जारी केलेल्या परवानगीची प्रत असल्याची खातरजमा करावी, असेही आवाहन केले आहे.
६६ हजारांवर वाहनांची नोंदणी
शासनाने पर्यावरणपूरक धोरण राबविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२१ लागू केले आहे. ई-बाईक्स व ई-वाहने यांना मोटार वाहन करातून धोरण कालावधीसाठी १०० टक्के सूट दिली आहे. आज अखेर एकूण ६६ हजार ४८२ इलेक्ट्रीक दुचाकी वाहनांची नोंदणी राज्यात झाली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61677 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..