
गोडसाखर निवृत्त कामगारांचे देणे साडेसात कोटींचे
24544
कोल्हापूर : गोडसाखरच्या निवृत्त कामगारांच्या देणींचा समावेश केलेल्या ताळेबंदाची प्रत अरुण काकडे यांच्याकडून स्वीकारताना शिवाजी खोत व बाळासाहेब लोंढे.
ताळेबंदात साडेसात कोटींची देणी
गोडसाखर निवृत्त कामगार; प्रशासकांकडून मिळाली ताळेबंदाची प्रत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांची सात कोटी ५८ लाखांची देणी मार्च २००२ अखेरच्या ताळेबंद पत्रकात समाविष्ट झाली आहेत. या ताळेबंदाची प्रत प्रशासक अरुण काकडे यांनी निवृत्त कामगार संघटनेकडे सुपूर्द केली आहे.
आठ वर्षांपासून कारखान्यातून निवृत्त झालेल्या तीनशेहून अधिक कामगारांची देणी प्रलंबित आहेत. ग्रॅच्युईटी, प्राव्हिडंट फंडासह इतर रकमांचा यात समावेश आहे. ही थकीत देणी मिळावीत म्हणून माजी संचालक शिवाजी खोत यांच्या नेतृत्वाखाली निवृत्त कामगारांची संघटना गेल्या दीड वर्षापासून आंदोलनाद्वारे प्रयत्न करीत आहे. दरम्यान, आंदोलनाच्या सुरुवातीला ब्रिस्क कंपनीने कामगारांची दीड कोटीची देणी दिली आहेत. ही रक्कम वजा करूनच आता ताळेबंदामध्ये साडेसात कोटींच्या देणींचा उल्लेख केल्याचे सांगण्यात आले.
महिन्यापूर्वी निवृत्त कामगारांच्या देणींचा समावेश कारखान्याच्या आर्थिक ताळेबंद पत्रकात करण्याची मागणी निवेदनातून केली होती. महिना उलटला तरी अद्याप ही प्रक्रिया झाली नव्हती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच निवृत्त कामगार संघटनेने रास्ता रोको व गडहिंग्लज बंद आंदोलन केले. त्या दिवशी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी बुधवारी (ता. २५) ताळेबंद प्रत देण्याची लेखी हमी प्रशासक काकडे यांना देऊन आंदोलन स्थगित करण्यास सांगितले. या लेखी हमीनंतर आंदोलन स्थगित केले होते. बुधवारी ही प्रत काकडे यांनी संघटनेचे प्रमुख शिवाजी खोत व बाळासाहेब लोंढे यांच्याकडे दिली.
चौकट...
अशी मिळणार रक्कम
ग्रॅच्युईटी, प्राव्हिडंट फंडासह इतर शासकीय कपातीची रक्कम शंभर टक्के मिळणार आहे, तर कारखान्याकडील रिटेन्शन अलाऊन्स, वार्षिक पगारवाढीचा फरक, मंत्री समितीची वाढ अशी एकूण थकितापैकी करारानुसार ४० टक्के रक्कम कामगारांच्या पदरात पडणार असल्याचे समजते.
आंदोलन सुरूच...
कामगारांची देणी ताळेबंद पत्रकात आली असली तरी आता ही रक्कम भविष्यात कारखाना चालवण्यासाठी येणाऱ्या कंपनीसोबतच्या करारात समाविष्ट होऊन कामगारांच्या हातात पडेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा श्री. खोत यांनी दिला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61808 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..