
टिपरचालक संप
24564
टिपर चालकांचे कामबंद आंदोलन
शहरात कचरा उठाव ठप्प; पगारवाढीसह फंडाची रक्कम जमा करण्याची मागणी
कोल्हापूर, ता. २६ ः वेळेवर पगार, तसेच प्रॉव्हिडंट फंड जमा केला जात नाही, दीड हजार पगारवाढ दिली नसल्याने १०४ टिपरवरील १२० चालकांनी आज सकाळपासून कामबंद आंदोलन केले. त्यामुळे अनेक भागांतील घरातून कचरा उठावचे काम झाले नाही. दुसऱ्या कंपनीचे ६५ टिपरचे काम मात्र सुरू होते. सायंकाळी बंद टिपरवर चालक देऊन काही भागातील कचरा उठाव करण्याचा प्रयत्न केला.
घराघरातून ओला, सुका कचरा संकलित करण्यासाठी १६९ टिपर महापालिकेने ठेवले आहेत. सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत कचरा संकलन केले जाते. दोन कंपन्यांकडून चालक नेमले आहेत. त्यातील १०४ टिपरचे काम करणाऱ्या कंपनीच्या चालकांनी आज सकाळी टिपर बाहेर काढलेच नाहीत. वेळेवर पगार जमा केला जात नाही. प्रॉव्हिडंट फंडही वेळेत जमा केला जात नाही, असे चालकांचे मत आहे. मध्यंतरी पगारवाढीबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत बैठक होऊन दीड हजार रुपये पगारवाढ देण्याचा निर्णय झाला होता. ती वाढही अजून दिलेली नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केले. दरम्यान, दुपारी पगार, प्रॉव्हिडंट फंड जमा केला जात असून, कामावर येण्याबाबतचा मेसेज मोबाईलवर दिला होता; पण चालक आले नाहीत. दुसऱ्या कंपनीचे चालक असलेले ६५ टिपरचे काम मात्र सुरू होते. तसेच जे टिपर बंद होते, त्यावर दुसरे चालक नेमून काम करून घेण्याचा प्रयत्न केला. एक टिपर बंद असल्यास दिवसाला ५०० रुपये दंड आकारण्याचे करारात आहे. त्यामुळे आज १०४ टिपर बंद असल्याने ठेकेदाराला ५२ हजार दंड केला जाणार आहे, असे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांनी सांगितले.
कचऱ्याचा ढीग वाढलेला
टिपरद्वारा संकलित होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रियेचे काम करणाऱ्या कंपनीची मुदत संपली आहे. त्याच्याकडून काम करून घेण्याचे प्रयत्न प्रशासनाचे सुरू आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. विजय पाटील यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यावर कचरा घोटाळा प्रकरणात कारवाई प्रस्तावित केली आहे. त्यांच्याकडेच कचऱ्याबाबतचे काम सोपवले जात आहे. यापूर्वी हे काम मुख्य आरोग्य निरीक्षकांकडून पाहिले जात होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61821 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..