हळद बदलेले शेतकऱ्यांचे गणित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हळद बदलेले शेतकऱ्यांचे गणित
हळद बदलेले शेतकऱ्यांचे गणित

हळद बदलेले शेतकऱ्यांचे गणित

sakal_logo
By

हळद ः बदललेले शेतकऱ्यांचे गणित
लग्न, शुभकार्यासह आहारात अविभाज्य घटक असलेल्या हळदीचे महत्त्व विविधांगी आहे. यामध्ये मूलतः औषधी गुणधर्म असल्यामुळे हळदीला आयुर्वेदामध्ये; पर्यायाने मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. हळदीची लागवड अगदी प्राचीन काळापासून भारतात होत आली आहे. गडहिंग्लज उपविभागातील आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांत आजही शेतकरी आपल्या परसबागेत हळद पिकवतो आहे. हळदीचे व्यावसायिक महत्त्व मात्र अजूनही शेतकऱ्यांना उमगलेले नाही. काही प्रयोगशील शेतकरी व्यापारी तत्त्वावर हळदीची लागवड करीत आहेत. हे प्रयोग येथे यशस्वी झाले असून त्यांना स्थानिक बाजारपेठेसह कार्पोरेट बाजारपेठ खुणावू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यावसायिक तत्त्वावर हळदीची लागवड केल्यास हे पीक येथील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बदलून टाकेल.
- रणजित कालेकर, आजरा. अजित माद्याळे, गडहिंग्लज. सुनील कोंडुसकर, चंदगड
--------------------
पारंपरिक पद्धतीने हळदीचे उत्पादन
शेकडो वर्षांपासून गडहिंग्लज उपविभागातील शेतकरी हळदीचे उत्पादन घेत आला आहे. यासाठी ते स्थानिक राजापुरी हळद या पारंपरिक देशी वाणाचा वापर करत आहेत. सेंद्रिय पद्धतीने परसबागेमध्ये ते उत्पादन घेत असतात. कुंडी, परसबागेतील मोकळ्या जागेपासून ते दहा गुंठे क्षेत्रावर पीक घेणारे असंख्य शेतकरी आहेत. पण यांची नोंद कृषी विभागाकडे नाही. त्यामुळे या तीन तालुक्यांत पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन देखील हळदीचे पीक मात्र दुर्लक्षित राहिले आहे. शेतकऱ्यांच्या सात-बाऱ्यावर पिकाची नोंद होणे गरजेचे आहे.

वन्य प्राण्यांपासून नुकसान नाही
आजरा, गडहिंग्लज व चंदगड या तीन तालुक्यांत हत्ती, गवे व अन्य वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी शेतीतून बाहेर पडत आहेत. या तीन तालुक्यांत जंगलाकडील शेती पड पडत चालली आहे. हे चित्र शेतीउद्योगासाठी फारसे चांगले नाही. हे पाहता पर्यायी पीक म्हणून हळदीकडे पाहता येईल, असे शेतीतज्ज्ञ सांगतात. कारण हळदपिकाचे हत्ती, गवे व अन्य वन्य प्राणी नुकसान करीत नाहीत. त्यामुळे जंगलाकडील व पड जमिनीवर हे पीक घेणे फायदेशीर ठरू शकते.

पोषक हवामान
या तीन तालुक्यांत हळदीच्या पिकासाठी पोषक हवामान आहे. हळदीच्या पिकाला सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. वाढीच्या काळात तीस अंश सेंटिग्रेट व समशितोष्ण हवामान मानवते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात जास्त थंड हवामान असल्यास गड्डा चांगला पोसतो. एप्रिल ते मे महिन्यातील तीस ते पस्तीस अंश सेंटिग्रेट तापमान हळदीच्या उगवणीसाठी अनुकूल असते, तर पिकाच्या वाढीसाठी गरम व दमट हवामान अनुकूल असते. समुद्रसपाटीपासून १५०० मीटरपर्यंतच्या सर्व प्रदेशांत हळदीचे पीक चांगले येऊ शकते.

जमीन
मध्य काळी, भुसभुशीत पिकाचे उतम पोषण होईल, अशी कसदार गाळाची आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन हळद लागवडीसाठी उपयुक्त असते. पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत किंवा कमी निचऱ्याच्या जमिनीत कंद नासणे हा रोग मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे क्षारयुक्त, पाणथळ, चिबड, कमी निचऱ्याच्या व कडक होणाऱ्या जमिनीत हळद चांगली येत नाही म्हणून अशा जमिनी टाळाव्यात.

बियाणे
हळद लागवड करत असताना योग्य जातीचे बियाणे निवड करून घेणे महत्त्वाचे असते. जातीपरत्वे हळद काढण्यास सात ते नऊ महिने लागतात. आंबेहळदीसारख्या हळव्या जाती लागवडीपासून सहा ते सात महिन्यांत काढणीस येतात. निमगरव्या जाती सात ते आठ महिन्यांत काढणीस येतात. सेलम व कृष्णा गरव्या जाती आठ ते नऊ महिन्यांत काढणीस येतात. त्यामुळे हळद लागवडीपूर्वी उपलब्ध पाणीसाठ्यानुसार योग्य त्या जाती निवड गरजेचे असते. हळद लागवडीसाठी जेठा गड्डे, बगल गड्डे आणि हळकुंडे बेणे म्हणून वापरले जाते.

आंतरमशागत
हळदीचे कोंब उगवणीच्या काळात तण वाढू देऊ नये. त्यामुळे हळदीच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. वेळोवेळी आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढावे. एक ते दीड महिन्यांनी खतांची मात्रा देताना हळदगड्ड्याच्या बाजूला हलकी कुळवणी करून पिकाला मातीची भर द्यावी. यालाच ‘उठाळणी’ असेही म्हटले जाते. त्यामुळे तंतुमुळे तुटून नवीन फूट येण्यास मदत होते. तसेच गड्ड्यांच्या भोवतालची माती भुसभुशीत झाल्याने कंदाची वाढ चांगली होते. ज्या ठिकाणी कठीण किंवा कडक जमीन झाली असेल, त्या ठिकाणी झाडांची वाढ होत नाही व कंद पोसत नाहीत.

हळदीचा वापर
हळदीला धार्मिक, आर्थिक, औषधी व सामाजिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहाराबरोबर औषधे, सौंदर्य प्रसाधने, जैविक कीटकनाशके आणि सामाजिक, सांस्कृतिक कार्यातही मोठ्या प्रमाणात होतो. धार्मिक विधी, विवाह संस्कार, पूजा, भंडारा, गौरी गणेशातील ववसा पूजन, पांडवपूजेतील खाद्यपदार्थ यासह विविध उकडी पदार्थ आदींसाठी हळद, हळकुंड आणि हळदीच्या पानांचा वापर होतो.

मिश्र पीक पद्धतीने अधिक उत्पन्न
हळदीमध्ये मिश्र पीक म्हणून मिरची, घेवडा, कोथिंबीर, मूग, उडीद, मुळा, भुईमूग आदी मिश्र पीक घेतल्यास शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा मिळू शकतो. हळदीबरोबर अन्य पिकांच्या उत्पादनातून शेतकरी चांगली आर्थिक कमाईं करू शकतात.

हळदीमधील औषधी गुणधर्म
आयुर्वेदातील शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्त शुद्धिकारक, बलवर्धक, कृमीनाशक, आम्लपित्तहारक, भूक वाढविणारी आहे. हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो. तसेच रक्तशुद्धीसाठी गुणकारक आहे. पायवर सूज आल्यास हळद, गूळ व गोमूत्र गरम करून प्यावे, हळद डोळ्यांच्या विकारावरही गुणकारी आहे. डाळीच्या पिठात थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व चार ते पाच थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग, अंगावरील खाज दूर होऊन पूर्ण अंगकांती सुधारते.

हळदीबाबत ‘पेटंट’ची लढाई
अमेरिकेने हळदीचे ‘पेंटट’ १९९५ ला घेतले होते. यावर भारत सरकारतर्फे कौन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्चचे (सीएसआयआर) या संस्थेने आक्षेप घेतला होता. याबाबत झालेल्या कायदेशीर लढाईत भारताला यश आले. ‘सीएसआयआर’ या संस्थेचे संचालक व शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू भक्कमपणे मांडली होती. हळद हा आमचा राष्ट्रीय गौरव असून पुरातन काळापासून तिचा आर्युर्वेदिक व धार्मिक कामासाठी उपयोग होत आला आहे. भारतीय संस्कृतीत दैनंदिन जीवनात हळीदाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो, या भूमिकेमुळे हळद ही भारताची असल्याचे उघड झाले आणि अमेरिकाला ‘पेटंट’ सोडावे लागले.

ब्रँडिंग व पॅकेजिंग
महाराष्ट्रात सांगली ही सर्वांत मोठी हळद बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथे वर्षभर मोठ्या प्रमाणात हळदीची खरेदी आणि विक्री होते. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हळदीवर प्रक्रिया करून उत्पादित झालेल्या मालाचे योग्य ब्रँडिंग आणि पॅकेजिंग करून त्याची विक्री केल्यास चांगला दर मिळू शकतो.

सेंद्रिय हळद उत्पादन
पारंपरिक नैसर्गिक पद्धतीने येथील शेतकरी हळदीचे उत्पादन घेत आहेत. यासाठी राजापुरी हळद आणि अन्य देशी वाणांची येथे लागवड होते. हळद पिकाकडे व्यावसायिक आणि आर्थिक फायदा देणारे पीक म्हणून बघितले जात नसल्याने येथील हळदीचे उत्पादन तुलनेने कमी आहे. हवामानाची अनुकुलता लक्षात घेऊन व्यावसायिक पद्धतीने आणि सेंद्रिय हळद लागवडीतून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. या सेंद्रिय हळदीच्या विक्रीसाठी नवी बाजारपेठ शोधणे हे देखील तितकेच महत्त्वाचे राहील.
------------------
हनिमनाळच्या प्रकल्पाला
चालना गरजेची
आठ वर्षांपूर्वी हनिमनाळ (ता. गडहिंग्लज) येथे बलभीम सेवा संस्थेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचा गट तयार करून हळद उत्पादनाला सुरवात केली. सुमारे शंभरभर शेतकरी शंभर ते सव्वाशे एकरावर हळद घेत होते. केवळ उत्पादनच नव्हे, तर जागेवरच त्यावर प्रक्रिया करून पावडरही तयार केले जाऊ लागले. शेतकऱ्यांना बियाणे घेण्यासाठी संस्थेने अर्थसहाय्य केले. उत्पादित हळदीचे कुकिंग, ग्रायंडिंग करून पावडर तयार होत होती. अखेरच्या टप्प्यात या हळदीला ब्रँड मिळवण्यापर्यंतची वाटचाल झाली. संस्थेला या प्रकल्पापासून चांगला फायदाही होत होता. हळदीचे उत्पादन सुरू झाले, तेव्हाच त्याचा दर पडला. प्रतिटन ४० हजारांवर पोहोचलेला दर नऊ हजारांवर येऊन थांबला. शेतकरी तोट्यात येऊ नये म्हणून त्या वेळी नऊ हजार रुपये दर असतानाही संस्थेने ११ हजार रुपये क्विंटलने हळद खरेदी केली. त्यामुळे शेतकरी तरले. परंतु त्यानंतर उसापेक्षा सहा ते सात महिन्यांचे हे पीक कसे फायदेशीर आहे, याचे प्रबोधन करण्यात अपयश आल्याने हा प्रकल्प वर्षानंतरच बंद पडला. हनिमनाळच्या शेतकऱ्यांचे अनुकरण पंचक्रोशीतील गावांमध्येही सुरू झाले. उत्पादित हळद प्रक्रियेसाठी हनिमनाळला जाऊ लागली. मात्र हनिमनाळमध्येच या प्रकल्पाला ‘ब्रेक’ मिळाल्याने अन्य शेतकरीही पुन्हा उसाकडे वळले. आता हनिमनाळच्या या प्रकल्पाला चालना देण्याची गरज आहे. आता एकही शेतकरी हळदीचे उत्पादन घेत नसून या ‘हळद क्लस्टर’चे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे.

--------------------
तीन तालुक्यांमधील
सरासरी हळद उत्पादन
- तीन तालुक्यांतील हळदीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
आजरा - ३०, गडहिंग्लज - ३०, चंदगड- १५
- उत्पादित शेतकऱ्यांची संख्या
१५०० यात आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.
- हेक्टरी उत्पादन
९० क्विंटल (ओली हळद), वाळवल्यानंतर ३० क्विंटल पावडर मिळते
- तीन तालुक्यांतील उत्पादन
सुमारे ७०० टन ओली हळद
- बाजार/दर
शेतकरी स्थानिक बाजारपेठेत प्रतिकिलो २०० रुपये दराने विक्री करतात
----------
कोट
25141
गडहिंग्लज उपविभागात हळद उत्पादनवाढीसाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. ‘आत्मां’तर्गत हळद उत्पादक शेतकरी गटबांधणी करून ‘प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्ननय’ योजनेंतर्गत प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित यावे व कृषी विभागाशी संपर्क करावा.- भाग्यश्री पवार-फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी, गडहिंग्लज

25142
गेली पाच वर्षे हळदीचे पीक घेत आहे. यातून वर्षाला चांगली अर्थप्राप्ती होते. एकरी सुमारे सव्वा लाख रुपये वर्षाला उत्पन्न मिळते. स्थानिक बाजारपेठ व व्यापाऱ्यांकडे हळदीची विक्री करत आहे. देशी वाण असल्याने चांगली मागणी आहे.
- जयसिंग नार्वेकर, हळद उत्पादक शेतकरी, पोळगाव

24689
गडहिंग्लज तालुक्यातही हळद उत्पादन होऊ शकते, हे हनिमनाळच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले. केवळ प्रबोधनात खंड पडल्याने हनिमनाळचा प्रकल्प बंद झाला. पुन्हा या प्रकल्पाला चालना देणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. बलभीम संस्था आणि शेतकऱ्यांना हा प्रकल्प फायदेशीर ठरत होता. त्यांना पुन्हा प्रोत्साहित केल्यास हळदीचा प्रयोग यशस्वी होईल.
- संजयकुमार पाटील, हनिमनाळ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62061 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top