
बंद दरवाजे, रिकाम्या खुर्च्यांनी स्वागत!
24739
चंदगड ः प्रशासकीय इमारतीत कामांसाठी आलेल्या नागरिकांचे स्वागत अनेकदा तहसीलदार कक्षाच्या बंद दरवाजानेच होते.
बंद दरवाजे, रिकाम्या खुर्च्यांनी स्वागत!
चंदगड तहसील कार्यालयातील स्थिती; नागरिक संतप्त; कामांसाठी खेटे, पैसा आणि वेळेचा अपव्यय
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २७ ः कामाच्या अपेक्षेने कार्यालयात आलेल्या नागरिकांचे स्वागत होते ते तहसीलदारांच्या बंद दरवाजाच्या कक्षाने आणि कार्यालयातील रिकामी टेबल- खुर्च्यांनी. चंदगड तालुक्यातील नागरिक पन्नास-साठ किलो मीटरहून येथे येतात आणि अधिकारी, कर्मचारी नाहीत म्हणून परत घरी जातात. अनेकांचा हा अनेकवेळचा अनुभव. त्यामुळेच या कार्यालयात टेबल- खुर्च्या काम करतात का असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून पाच वर्षापूर्वी येथे देखणी प्रशासकीय इमारत बांधली. परंतु या इमारतीच्या स्वच्छतेपासून ते कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीपर्यंत अनेक प्रश्न आहेत. नियमित स्वच्छता कर्मचारी नसल्याने इमारतीत प्रवेश केल्यापासून त्याचे परिणाम जाणवू लागतात. रिकामी जागेतील अस्वच्छता, जीन्यांच्या पायऱ्यांवर साचलेला कचरा, जळमटे यामुळे शासनाचा उद्देश खरोखरच साध्य झाला का असा प्रश्न पडतो. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असून सरासरी जमीनधारणाही जास्त आहे. त्यामुळे शेतीविषयक अनेक व्यवहार नियमितपणे होत असतात. शैक्षणिक, नोकरीविषयक कामांसाठी महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज असते. मात्र इथे दाखल केलेल्या अर्जाचा वेळेत निपटारा होईल याची शाश्वती नाही. इथले व्यवस्थापन बिघडले असल्याचे नागरीक सांगतात. प्रत्येक कामात अर्थ शोधणारे कर्मचारी ठराविक विषयांच्या फायली ताबडतोब मार्गस्थ करतात. परंतु इतर कामांबाबत मात्र दुर्लक्ष केले जाते. एका कामासाठी कार्यालयात किती वेळा खेटे मारायचे असा प्रश्न आहे. राजगोळी, तुडिये, कोदाळी, पारगड परीसरातून येणाऱ्या नागरिकांचे प्रवासात ये-जा करण्यातच दोन- तीन तास जातात. एवढ्या लांबून येऊन काम होत नसल्याने वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. कामाची पूर्तता होणे महत्त्वाचे असल्याने अनेकजण राग गिळून गप्प राहतात. परंतु सार्वजनिक ठिकाणी खूप वाईट शब्दात त्याची वाच्यता करतात. प्रशासनाने कामात सुधारणा करून नागरिकांची कामे कमीत कमी वेळेत निर्गत करावी अशी मागणी होत आहे.
---------------------
कोट
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी महसूलच्या कर्मचाऱ्यांचा वापर केला जातो. सध्या हे काम सुरू आहे. सातत्याने काही कर्मचाऱ्यांना कोल्हापूर, पुणे येथे जावे लागते. मुळातच कर्मचारी कमी असताना तेही निवडणुक कामात गुंतल्याने कामाचा उरक होण्यावर मर्यादा आहेत. परंतु त्यामध्ये सुधारणा केली जाईल.
- विनोद रणावरे, तहसीलदार, चंदगड.
----------------
उतारे दुरुस्तीसाठी वीस दिवसांपूर्वी अर्ज दिला आहे. मात्र अद्याप ते काम केले जात नाही. कार्यालयात कर्मचारी, अधिकारीच हजर नसतात. बिगरशेतीची कामे ताबडतोब होतात आणि इतर कामांकडे दुर्लक्ष केले जाते यामध्ये अर्थकारण लपले आहे.
- चंद्रकांत पाटील, हंबीरे
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62083 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..