
पत्रकांच्या प्रचंड पट्टा
शिवराज्याभिषेक दिन
सोहळ्याचे आयोजन
कोल्हापूर : निवृत्ती तरुण मंडळ, निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळातर्फे शुक्रवार (ता. ३) ते सोमवारपर्यंत (ता. ६) ३४९ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. विविध स्पर्धा, कार्यक्रमांचे आयोजन केले असून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता वक्तृत्व स्पर्धा होतील. शालेय गटासाठी शिवरायांचे आठवावे रुप, बाल शिवाजी व त्यांचे सवंगडी, शिवराज्याभिषेक, जिजाऊ भक्त शिवाजी महाराज तर महाविद्यालयीन गटासाठी युगप्रवर्तक शिवाजी महाराज, शिवतंत्र यशस्वी जीवनाचा मूलमंत्र, व्यवस्थापनाचा महामेरु छत्रपती शिवाजी महाराज, शिवरायांच्या गड किल्ल्यांचा जाज्वल्य इतिहास, असे विषय असतील. सायंकाळी सात वाजता महिलांसाठी कराओके गाण्यांच्या स्पर्धा होतील. शनिवारी (ता. ४) ग्रामीण हलगी वादन स्पर्धा तर रविवारी (ता. ५) शिवरायांच्या जीवनावरील चित्रपट सायंकाळी दाखविण्यात येईल. सोमवारी (ता. ६) सकाळी साडेसात वाजता मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक होईल. सकाळी दहा वाजता प्रसाद वाटप, सायंकाळी सहा वाजता स्पर्धांतील बक्षीस वितरण होईल. सायंकाळी सात वाजता स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा मर्दानी आखाडा यांची प्रात्यक्षिके असतील. रात्री दहा वाजता आतषबाजी होईल. सर्व स्पर्धांसाठी नाव नोंदणी एक जूनपर्यंत गजानन ऑटोमोबाईल, निवृत्ती चौक, जनता बझार जवळ सायंकाळी पाच वाजेपर्यंत करावी. राजेंद्र जाधव यांनी संयोजन केले आहे.
24969
कोल्हापूर : स्वतंत्र मजदूर युनियन शाखा कोल्हापूरतर्फे आयोजित बैठकीत बोलताना जे. एस. पाटील.
कामगार अधिकाऱ्यांनी
एकत्र येण्याची गरज : पाटील
कोल्हापूर, ता. २७ : ‘‘बहुजन कामगार अधिकाऱ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज,’’ असे स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांनी सांगितले. स्वतंत्र मजदूर युनियन शाखा कोल्हापूरतर्फे संघटित, असंघटित सर्व शासकीय आणि निमशासकीय विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची बैठक महालक्ष्मी हॉल येथे झाली. या वेळी श्री. पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणारे ४६ ते ४७ कोटी कामगार एससी, एसटी, डी.टी.एन.टी, ओबीसी, धार्मिक अल्पसंख्याक आहेत. सर्व क्षेत्रात वंचित समूहाचे संविधानिक हक्क धोक्यात आले आहेत. सर्व बहुजन कर्मचारी, अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन स्वतंत्र मजदूर युनियन बळकट करावी.’’ राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रेमानंद मौर्य यांनी पदोन्नतीमधील आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केलेला संघर्ष, लढ्याबाबत माहिती दिली. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष किशोर अहिवळे यांनी स्वतंत्र मजदूर युनियनच्या कार्याची माहिती दिली. आर. एस. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. संभाजी कांबळे, इंद्रजित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. विजय मोरे यांनी स्वागत केले. जे. पी. फाळके यांनी आभार मानले.
‘कविता युगधारकांच्या’चे उद्या प्रकाशन
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त शाहीर विजय शिंदे संपादित ‘शंभर कवींच्या कविता युगधारकांच्या’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोमवारी (ता. ३०) सकाळी १२ वाजता नवा राजवाडा येथे शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. श्रीराम पचिंद्रे, डॉ. बी. एम. हिर्डेकर, इंद्रजित सावंत, आनंद हाबळे, बाळासाहेब भोसले, युवराज कदम, दिलीप भोसले, चंद्रकांत देसाई, एस. एस. कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच्या शंभर कवितांचा या संग्रहात समावेश आहे.
24976
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील यांचा सत्कार करताना प्रा. जयकुमार देसाई, डॉ. मंजिरी मोरे, प्राचार्य डॉ. पी. के. पाटील, एस. एच. पिसाळ.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक
धोरण विद्यार्थिभिमुख : डॉ. पाटील
कोल्हापूर, ता. २८ : ‘‘देशासमोरील आव्हाने विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित आणि त्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन लवकरच अंमलात येणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थीभिमुख, परिपूर्ण आहे. शिक्षणातील सर्व घटकांनी त्याला समोर जाण्याची तयारी ठेऊ या,’’ असे मत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी व्यक्त केले. गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमधील व्याख्यानात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. पी. के. पाटील अध्यक्षस्थानी होते. शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशासन अधिकारी डॉ. मंजिरी मोरे यांनी व्याख्यानाचे स्वरूप स्पष्ट केले. प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांचे आजपर्यंतच्या शैक्षणिक, संशोधन कार्याबद्दल सचिव जयकुमार देसाई यांच्या हस्ते सत्कार झाला. तक्षशिला नालंदा विद्यापीठातील पूर्वीची शिक्षण पद्धती, सध्याची शिक्षणपद्धती आणि मॅकलेची शिक्षणपद्धतीचा ऊहापोह करीत आत्मनिर्भर भारताकरिता येणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्याची उपयुक्ततेवर डॉ. पाटील यांनी माहिती दिली. विद्यार्थी, प्राध्यापकांच्या शंकाचे निरसन केले. दौलत देसाई, उपप्राचार्य एस. एच. पिसाळ उपस्थित होते. प्रा. पी. बी. झावरे यांनी परिचय करून दिला. प्रा. डॉ. आर. बी. भुयेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. आर. घाटगे यांनी आभार मानले. प्रा. ए. एम. गाईंगडे, प्रा. डी. के. नरळे यांनी आयोजन केले.
24979
कोल्हापूर : हिंदू महासभेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर.
हिंदू महासभेच्या कार्यालयाचे उद्घाटन
कोल्हापूर : अखिल भारत हिंदू महासभा, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हिंदू महासभेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री. सोरप यांनी स्वातंत्र्यवीरांना झालेल्या अंदमान कैदेचा उल्लेख करून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या वर्षानिमित्त अंदमान यात्रेस शासनाने सवलत घोषित करावी, असे सांगितले. संजय कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्यालयास भरीव मदत केल्यामुळे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून श्री. सोरप यांच्या हस्ते सत्कार केला. राजेंद्र शिंदे, जयवंत निर्मळ, शरद माळी, रेखा दुधाणे, मनीषा पवार, ॲड. माधुरी म्हेत्रे-पाटील आदी उपस्थित होते.
‘कनवा’त मंगळवारी कार्यक्रम
कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिरामध्ये मंगळवारी (ता. ३१) सकाळी ११ वाजता ‘लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. लेखक रवींद्र गुर्जर, शाम जोशी थेट वाचकांशी संवाद साधणार आहेत. वाचकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यवाह डॉ. आशुतोष देशपांडे यांनी पत्रकाद्वारे केले.
२४९६८
विद्यापीठात सावरकर जयंती
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आज सकाळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62487 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..