
महिला ग्रामसेवकांनी घेतली ग्रामविकास मंत्र्यांची भेट
चंदगडची बदली रद्द करण्यासाठी फिल्डिंग
महिला ग्रामसेवक हवालदिलची; ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांना घातले साकडे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : मागील १५ वर्षांहून अधिक काळ एकाच तालुक्यात तळ ठोकून बसलेल्या ग्रामसेवकांच्या बदल्या चंदगड तालुक्यात केल्या. अचानक चंदगडचे आदेश मिळाल्याने धक्का बसलेले ग्रामसेवक बदली होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. कधी नव्हे ते चंदगडचा कोरम पूर्ण झाला आहे. आता बदल्या रद्द करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आज सकाळी चंदगडला बदली झालेल्या महिला ग्रामसेवकांनी कुटुंबीयांसह ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत बदली रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान, एक महिला ग्रामसेवक धाय मोकलून रडल्याचा प्रकार घडला. यावर संबंधित महिलांची काही सोय करता येईल का, याबाबत मंत्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
एकाच तालुक्यात अनेक वर्षे मुक्काम करून काही ग्रामसेवक पुढारी झाले आहेत. काम करण्यापेक्षा राजकारणच अधिक सुरू आहे. वर्षोनवर्षे एकाच गावात व तालुक्यात काढल्याने मक्तेदारी झाली आहे. काही ग्रामसेवक हे वर्षोनवर्षे चंदगडमध्ये काम करून त्रासले आहेत. कधीतरी आम्हाला इतर तालुक्यात काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. मागणीनंतर मंत्री मुश्रीफ यांनी ग्रामसेवकांच्या तत्काळ बदल्या करण्याचे आदेश दिले. ग्रामसेवकांच्या १० वर्षांपूर्वी प्रशासकीय बदल्या केल्या होत्या. तब्बल दहा वर्षांनंतर या बदल्या करण्याचा निर्णय झाला. त्यातून तब्बल ३० ग्रामसेवकांना चंदगडचा रस्ता दाखवण्यात आला. यामध्ये आठ महिलांचा समावेश आहे. चंदगडचे आदेश मिळताच महिला ग्रामसेवकांमधून नाराजी व्यक्त केली. काहींनी तर मंत्री, खासदार, आमदारांचा वशिला लावला; मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी याला दाद दिली नाही. उलट ग्रामसेवकांनाच खडे बोल सुनावले.
करवीर, कागल नाहीच
मुख्य कार्यकारी अधिकारी दाद देत नसल्याने महिला शिष्टमंडळाने सहकुटुंब मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित महिलांना चंदगडऐवजी अन्य ठिकाणी बदली देता येईल का, याची खात्री करण्याची सूचना केली. त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव माहिती घेत आहेत. चंदगडऐवजी राधानगरी, भुदरगड, शाहूवाडीत पदस्थापना देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. कोणत्याही स्थितीत या महिलांना करवीर, कागल, हातकणंगलेत पदस्थापना द्यायची नाही, असाही निर्णय घेतला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62577 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..