संजय राऊत महाराज भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत महाराज भेट
संजय राऊत महाराज भेट

संजय राऊत महाराज भेट

sakal_logo
By

25235
श्रीमंत शाहू महाराजांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
खासदार संजय राऊत यांनी जोडून दिला फोन; न्यू पॅलेसला दिली भेट

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२९ ः राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निमित्ताने रंगलेले राजकारण व छत्रपती घराण्याच्या सहभागामुळे राजकीय पटलावर सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज न्यू पॅलेसवर जाऊन श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जोडून दिलेल्या फोनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराजांशी चर्चा केली. कोल्हापूरला आल्यानंतर भेटण्याचे आश्‍वासन देताना भेटीचे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांनी दिले. तर घराण्याच्या अवमानाबाबत महाराजांनी दाखवलेल्या स्पष्टवक्तेपणाने सर्वांचा संभ्रम दूर केल्याचे सांगताना खासदार राऊत यांनी काहीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले.
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार राऊत यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. तिथून ते न्यू पॅलेसवर गेले. त्यांचे स्वागत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले. त्यानंतर महाराजांच्या तब्येतीची विचारपूस करून चर्चा केली. यात कोल्हापूरला बऱ्याच कालावधीनंतर आलो असल्याचे सांगताना कोल्हापूरचे लोक आवडले. त्यांचा स्पष्टपणाही आवडल्याचे महाराजांना सांगितले. माजी खासदार संभाजीराजे यांच्या उमेदवारीवरून झालेल्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
खासदार राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, ‘‘मुख्यमंत्री ठाकरेंनी फोन करून कोल्हापुरात आहात तर महाराजांचे आशीर्वाद घ्या, मलाही त्यांच्याशी बोलायचं आहे, असे सांगितले होते. त्यानुसार मी आज त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रबोधनकार ठाकरेंपासून छत्रपती घराण्याशी ठाकरे घराण्याचे नाते आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी येथे यापूर्वी भेट दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन जोडून दिला. त्यांचे काहीकाळ बोलणे झाले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोल्हापूरला आल्यानंतर महाराजांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच महाराजांना भेटीचे निमंत्रण दिले. छत्रपती घराण्याला कुणी चुकीची माहिती देऊ शकत नाही, ते छत्रपती आहेत.’’ सहाव्या जागेचा विषय संपल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार संजय मंडलिक, राज्यसभेचे उमेदवार संजय पवार, माजी आमदार सुजीत मिणचेकर, ऋतुराज क्षीरसागर, अरुण दुधवडकर, व्ही. बी. पाटील आदी उपस्थित होते.
-
पक्षप्रवेशाच्या
जुन्या आठवणींना उजाळा
महाराजांशी चर्चा करताना खासदार राऊत यांनी खासदार मंडलिक यांना महाराज काहीकाळ सेनेत होते हे तुम्हाला माहीत आहे का ? अशी विचारणा केली. तसेच बाळासाहेब ठाकरेंशी महाराजांची झालेली भेट, पक्षप्रवेश कसा झाला या आठवणी सांगितल्या. त्यावेळी महाराजांनी खासदार मंडलिकांच्या वडिलांना ते माहीत होते अशी जोड दिली.


चौकट

संभाजीराजेंना पुढे करून
राजकारण करणाऱ्यांची उडी फसली
श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांबाबत जसा आदर आहे, तसेच माजी खासदार संभाजीराजेंविषयीही प्रेम आहे. आम्हाला वादातून कोणतेही राजकारण करायचे नाही. पण संभाजीराजेंना पुढे करून ज्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची उडी फसली, ’’असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. संभाजीराजे यांनी केलेल्या ट्विटबाबत पत्रकारांशी ते बोलत होते. राऊत म्हणाले, ‘‘शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही. संभाजीराजेंना शिवसेनेची उमेदवारी घ्या. आमची मते तुम्हाला देऊ, असे सांगितले होते. बेळगावमध्ये एकीकरण समिती फुटत आहे, त्यामुळे मराठी माणसांची एकजूट अडचणीत आली. त्याचा फटका सीमाभागाला बसत आहे. यापुढे शिवसेना बेळगावातील सर्व निवडणुका स्वतः लढवेल.’’
--

...अन्यथा तुमच्याशिवाय ठरवू
‘आमचं ठरलंय’ या मुद्यावर बोलताना खासदार राऊत यांनी महाविकास आघाडीच्या लोकांशी संपर्क सुरू आहे. आता कोल्हापुरात यापुढे एका-दोघांचे ठरलंय असे चालणार नाही. आघाडी म्हणूनच ठरलं पाहिजे, नाही तर तुमच्याशिवाय आम्ही ठरवू व आमचा निर्णय घेऊ, असा इशारा पुन्हा दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62638 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top