पान ७ मेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ७ मेन
पान ७ मेन

पान ७ मेन

sakal_logo
By

फुटबॉल किक

चौदा फुटबॉल संघांची माघार
---
‘केएसए’ गडहिंग्लज लीग; औपचारिक स्पर्धेसाठी केवळ सहाच संघाची नोंदणी
दीपक कुपन्नावर ः सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : स्थानिक हंगामाचा समारोप कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या (केएसए) गडहिंग्लज लीगने होण्याची शक्यता आहे. वस्तूतः जगभरात लीगने सर्वत्र हंगामाचा श्रीगणेशा होत असताना याठिकाणी मात्र हंगामाचा शेवट लीगने होत आहे. या पार्श्वभूमीमुळेच स्थानिक संघांनी यंदा लीग रद्द करावी, अशी मागणी ‘केएसए‘कडे केली होती. त्यामुळेच तब्बल १४ संघांनी आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी होणाऱ्या या स्पर्धेतून माघार घेतली आहे. केवळ सहा संघांनी नोंदणी केली आहे.
दोन वर्षे लॉकडाउनमुळे येथील फुटबॉल हंगाम ठप्प होता. मात्र, यंदा ही कसर भरगच्च स्पर्धांनी भरून निघाली. सुमारे दीड डझनाहून छोट्या-मोठ्या स्पर्धा झाल्या. साहजिकच, स्थानिक संघांना यंदा स्पर्धांची मेजवानी मिळाल्याने खेळण्याची हौस पुरी झाली. दरवर्षी स्थानिक लीग आणि एखाद-दुसरी बाद पद्धतीची स्पर्धा असेच हंगामाचे स्वरूप असायचे. १७ वर्षांपासून सुरू असणारी दिवाळीतील युनायटेड करंडक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धाही प्रशासकीय परवानगी नसल्याने प्रथमच दोन वर्षे खंडित झाली.
दरवर्षी केएसए लीगमधून विजेते, उपविजेते झाल्यास कोल्हापुरात बाद पद्धतीच्या स्पर्धा खेळायला मिळतील, या आशेनेच स्थानिक संघ लीगमध्ये सहभागी होतात. पण, कोल्हापूरचा हंगामाचा समारोप करणारी नेताजी चषक स्पर्धा सुरू झाल्याने पात्र संघांना कोणतीच संधी मिळणार नाही. तसेच, पुन्हा तीन महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये संघांना नव्या हंगामासाठी नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळेच यंदा लीगच घेऊ नये, यासाठी संघांनी निवेदन देऊन मागणीही केली होती. लीगला सहभागासाठी क्रीडासाहित्य, किट आणि नोंदणीसाठी प्रत्येक संघाला सुमारे ५० हजारांचा खर्च करावा लागतो. त्यातच सुमारे २० हून अधिक स्थानिक खेळाडूंनी मानधनावर कोल्हापुरातील संघातून खेळण्याला प्राधान्य दिले आहे.

चौकट...
माघारीची कारणे
* पात्र ठरूनही कोल्हापुरात खेळायला मिळणार नाही
* वाढलेली केएसए नोंदणी फी
* पुन्हा तीन महिन्यांनी नोंदणी
* केएसए लीगला एकही रुपयाचे बक्षीस नाही
* क्रीडा साहित्याचे वाढलेले भरमसाट दर
* ग्रामीण भागात पुरस्कर्त्यांचा अभाव
* स्थानिकपेक्षा खेळाडूंचा कोल्हापुरात मानधनावर खेळण्याकडे कल

कोट..
खर्चाच्या तुलनेत एकही रुपयाचे लीगला बक्षीस नाही. तसेच, पुन्हा तीन महिन्यांनी नोंदणी करावी लागणार आहे. यंदा लीग रद्द करावे, अशी बहुतांश संघाच्या मागणीकडे दुर्लक्ष करून ही स्पर्धा होत आहे. त्यामुळेच यंदा लीगसाठी नोंदणी केली नाही.’’
- संतोष मांगले, अध्यक्ष, नवज्योत एफसी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62641 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top