
कबनूरला लवकरच नविन पोलिस ठाणे
कबनूरला लवकरच नवीन पोलिस ठाणे
प्रस्ताव अंतिम टप्प्यात ः ‘शिवाजीनगर, हातकणंगले’वरील ताण होणार कमी
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २९ ः कबनूर येथे नवीन पोलिस ठाणे लवकरच सुरू होत आहे. अनेक वर्षांपासून याबाबतचा प्रस्ताव शासन पातळीवर प्रलंबित आहे. मात्र या प्रस्तावाला आता गती आली असून त्यामुळे नजीकच्या काळात कबनूर हे नवीन पोलिस ठाणे अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर व हातकणंगले पोलिस ठाण्यांवरील भार कमी होणार आहे. शिवाय गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.
शहरात गावभाग पोलिस ठाणे सर्वात जुने आहे. त्यानंतर शहराचा विस्तार वाढल्याने शिवाजीनगर पोलिस ठाण्याची निर्मिती केली. अनेक वर्षे या दोन पोलिस ठाण्यांवरच शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा डोलारा अवलंबून होता. मात्र वाढत्या औद्योगिकरणानंतर शहराच्या वाढीव भागात गुन्हेगारीमध्ये जबर वाढ झाली. त्यावर नियंत्रण ठेवताना पोलिस यंत्रणेला अडचणी येवू लागल्या. गुन्हेगारीचा आलेख वाढतच राहिला. किंबहुना वस्त्रनगरी की गुन्हेगारीनगरी असे विदारक चित्र काही काळ निर्माण झाले होते. महाराष्ट्रात विविध ठिकाणी घडणाऱ्या अनेक गुन्हेगारी घटनांचा थेट इचलकरंजीशी संबंध येऊ लागला. त्यामुळे साहजिकच शहरात तिसऱ्या पोलिस ठाण्याची गरज भासू लागली.
आठ वर्षांपूर्वी नवीन शहापूर पोलिस ठाण्याला मंजुरी दिली. अनेक संवेदनशील परिसराचा समावेश शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केला. त्यामुळे गावभाग पोलिस ठाण्यावरील मोठा भार कमी झाला. शहराच्या वाढीव भागातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे सोयीचे झाले. तथापि, शहरातील विविध आंदोलने, घडामोडी, परिसरातील गंभीर घटनांचा आढावा घेताना आणखी एका पोलिस ठाण्याची गरज भासू लागली. त्यानंतर साधारणपणे पाच वर्षांपूर्वी कबनूर येथे स्वतंत्र पोलिस ठाणे करण्याचा प्रस्ताव तयार केला. त्याला आता गती आली आहे. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यात तीन नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये कबनूरचा समावेश असल्याची माहिती पोलिस दलाकडून देण्यात आली.
---------------
दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दी बदलणार
कबनूर पोलिस ठाणे अस्तित्वात आल्यानंतर शिवाजीनगर व हातकणंगले या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दी बदलणार आहेत. विशेष करुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यावरील मोठा भार कमी होणार आहे. तर सध्या कबनूर येथे शिवाजीनगर पोलिस ठाणे अंतर्गत पोलिस चौकी सुरु आहे.
----
संभाव्य हद्द अशी
कबनूर पोलिस ठाणे हद्दीसाठी कबनूर, चंदूर, रुई या तीन महत्वाच्या गावांसह शहरातील जवाहरनगर परिसर प्रस्तावित आहे. याशिवाय साजणी व तिळवणी या दोन गावांचा गरजेनुसार समावेश केला जावू शकतो. शासन पातळीवरून गेल्या फेब्रुवारीत या परिसराची गुन्हेगारी आलेखासह माहिती मागवली होती. या दोन्ही पोलिस ठाण्यांकडून याबाबतची माहिती शासनाला सादर केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62647 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..