
इचल :आयजीएममध्ये कंत्राटी 38 कर्मचारी रुजू
आयजीएममध्ये ३८ कर्मचारी रुजू
कंत्राटी पद्धतीने भरती; काही पद अनावश्यक भरल्याचे उघड
इचलकरंजी, ता. ३१ ः आयजीएम रुग्णालयामध्ये डीएम एंटरप्राइजेस कंपनीमार्फत कंत्राटी भरतीमधून विविध विभागांसाठी ३८ कर्मचारी रुजू झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयास काही अंशी आधार मिळणार आहे. उपचारामध्येही मदत होणार असल्याने त्यांची होणारी परवड कमी होणार आहे. भरती प्रक्रियेमध्ये काही पदे आवश्यकता नसताना भरल्याचे समोर आले आहे.
आयजीएम रुग्णालय अनेक वर्षांपासून अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्येशी झगडत आहे. वर्षभरात काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याने भार कमी झाला आहे. अद्यापही मंजूर पदांच्या तुलनेत कर्मचारी अपुरे आहेत. ही समस्या मार्गी लागण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे. त्यासाठी ई- टेंडर काढले असून, ते मुंबई येथील डीएम एंटरप्राइजेस कंपनीने घेतले आहे. भरती केलेल्या पदांमध्ये रुग्णालयास आवश्यकता नसलेली काही पदे भरती केली. ज्या पदांची अधिक आवश्यकता आहे, त्या कक्षसेवकांची २४ संख्या मंजूर असताना केवळ दोघे रुजू झाले होते. तेही कामावर येत नसल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र ३८ कर्मचारी हजर झाल्याने विविध विभागांतील कामकाजात गती येण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, २०२०-२१ मध्ये कोरोना काळात काम केलेल्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी कक्ष सेवक पदासाठी प्रथम आमचा विचार व्हावा, अशी मागणी केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी कामगार न्यायालयाचा दरवाजा ठोठविला आहे. त्याची मंगळवारी सुनावणी झाली असून, पुढील १० तारीख आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेला स्थगिती मिळणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
कर्मचारी भरती दृष्टिक्षेप
उपसंचालक आरोग्य सेवा मंडळाकडून एप्रिलमध्ये ४४ कुशल, तर ४२ अकुशल अशी ८६ पदे भरून घेण्याचे आदेश डीएम एंटरप्राइजेस कंपनीस दिले होते. त्यानुसार मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता १, अधिपरिचारिका २६, क्ष किरण शास्त्रज्ञ २, रुग्णवाहिका चालक १, लिफ्टचालक २, दूरध्वनी चालक २, शिंपी १, शिपाई २, अपघात विभाग सेवक १, अशी एकूण ३८ जणांची भरती केली.
अधिपरिचारिका अधिक
या भरती प्रक्रियेत अधिपरिचारिकांची संख्या अधिक आहे. कक्ष सेवकांची भरती नसल्याने रुग्णालयाचा स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. इमारत दुरुस्तीचे काम सुरू असल्याने कचरा, धुळीचे प्रमाण वाढत असताना स्वच्छतेचा भार केवळ ११ जणांवर आहे. लिफ्टचालकाची आवश्यकता नसताना भरती केली आहे.
कंत्राटी कर्मचारी भरतीत अनावश्यक पदे भरली आहेत. सध्या रुग्णालयाच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर असताना संबंधित पदे भरणे आवश्यक आहे. रुग्णांना जितके उपचार महत्त्वाचे आहेत, तितकीच स्वच्छताही महत्त्वाची आहे.
- कपिल शेटके, सदस्य, रुग्णकल्याण समिती
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63455 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..