
डावी आघाडी निदर्शने
२५६५७
डाव्या आघाडीतर्फे महागाईविरुद्ध निदर्शने
केंद्र सरकारचा निषेध; देशव्यापी आंदोलनातून केली मोदी सरकारची पोलखोल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः ‘वा रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू, महंगा तेल’, ‘महागाईला जबाबदार असणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत डाव्या आघाडीतर्फे बिंदू चौकात महागाईविरोधात निदर्शने करण्यात आली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतिश्चंद्र कांबळे म्हणाले, ‘‘मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. केंद्र सरकारने पेट्रोलचा दर ९ रुपये, तर डिझेलचा दर ७ रुपयांनी दर कमी केला, असे घोषित केले. मात्र ३१ मार्चला पेट्रोल व डिझेलचे जे दर होते, त्यापेक्षा जास्त आहेत. इंधनदर कमी केला ही बाब फसवी आहे. जीवनाश्यक वस्तूंचे दर अद्यापि कमी झालेले नाहीत. त्यामुळे सर्वसामन्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.’’
रघुनाथ कांबळे म्हणाले, ‘‘दरवाढीमुळे महागाई वाढती आहे. डिझेलवर कर लावून सरकारकडून नफेखोरी केली जात आहे. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत.’’
बी. एल. बर्गे म्हणाले, ‘‘क्रूड ऑईलचे दर कमी झाले असताना पेट्रोल-डिझेलचे दर कमी अपेक्षित प्रमाणात कमी केले नाहीत. यासोबत विविध करांच्या माध्यमातून सरकार कोट्यवधींची कमाई करीत आहे; जनता मात्र महागाईच्या खाईत लोटली जात आहे, याचा आम्ही निषेध करीत आहोत.’’
फेरीवाला संघटना नेते दिलीप पोवार म्हणाले, ‘‘सरकारने गॅसचा दर वाढवल्याने घराघरांतील महागाईची झळ पोहोचली आहे. त्यामुळे सामान्य जनताही या महागाईमुळे हैराण झाली असून सरकारने महागाई कमी करण्यासाठी पावले उचलावीत.’’
आंदोलनात प्रकाश जाधव, निल चव्हाण, सुनीता अमृतसागर, बाळासाहेब पवार, विजय धनवडे, बाबा ढेरे, गजानन विभूते, चंद्रकांत बागडी, इर्शाद फरास, विठ्ठल माने, मोहन क्षेत्रीय आदी उपस्थित होते.
लक्ष विचलित...
शेतकरी कामगार पक्षाचे संभाजी जगदाळे म्हणाले, ‘‘धर्माचे राजकारण पुढे करीत महागाईवरील लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहेत. मात्र सर्वसामान्य जनता महागाईमुळे हवालदिल झाल्याने सरकार विरोधी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63515 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..