
सीपीआरला मॉड्युलर ओटी
‘मॉड्युलर ओटी’अभावी
अतिगंभीर शस्त्रक्रियांना खीळ
सीपीआर रुग्णालय; रुग्णांचा दूरचा फेरा
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः सीपीआरमध्ये अतिगंभीर मेंदू विकाराच्या शस्त्रक्रिया किंवा अस्थिप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी मॉड्युलर ओटी (अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग) नसल्याने बहुतांशी रुग्णांना मोठ्या शहराकडे जावे लागत आहे. येथे मॉड्युलर ओटीची सुविधा झाल्यास रुग्णांचा दूरचा फेरा वाचण्याबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार घेता येतील. यातून रुग्णांना उपचारांचा लाभ, तर सीपीआरला आर्थिक लाभ होण्यास मदत होणार आहे.
सीपीआर रुग्णालयात विविध वैद्यकीय शाखांच्या अनुभवी डॉक्टर असल्याने येथे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, बेळगाव, सिंधुदुर्ग आदी भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. यातील अनेकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार होतात.
गेल्या दोन महिन्यांपासून मेंदू उपचार व शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. मात्र, ठराविक प्रकारच्या शस्त्रक्रियाच येथे होतात. मेंदूत झालेले मोठे फुगे, गाठी (ॲनोरिझम) तपासण्यासाठी अत्याधुनिक मायक्रोस्कोप नाही, तसेच अशा गाठी काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे, पूरक उपचार व काळजी घेण्यासाठी ‘मॉड्युलर ओटी’ लागते. या ओटीची निर्जंतुकीकरणाची क्षमता मोठी असते. तसेच शस्त्रक्रिया सूक्ष्म पातळीवर करण्यासाठी लागणारी तांत्रिक साधने असतात. मात्र, येथील सध्याची ओटीही आधुनिक आहे. येथे नियमित शस्त्रक्रिया होतात, मात्र अत्याधुनिक सुविधांची मॉड्युलर ओटी नाही. त्यामुळे अशा अतिगंभीर किंवा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया येथे होत नाहीत.
थोड्याफार फरकाने अशीच अवस्था अस्थी रोगाबाबत आहे. येथील अनुभवी डॉक्टर नियमित हाडांच्या शस्त्रक्रिया जरूर यशस्वी करतात. मात्र, जिथे सांधेरोपण अस्थिप्रत्यारोपण करण्याची गरज असते. अशा मोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मॉड्युलर ओटी नसल्याचा अडथळा आहे. अशा प्रकारची ओटी नसल्याने महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या राज्यस्तरीय समितीने मोठ्या शस्त्रक्रियेसाठी सीपीआरला तूर्त मान्यता दिलेली नाही. परिणामी अशा प्रकारच्या मोठ्या शस्त्रक्रिया करायच्या झाल्यास विशेषतः मेंदू व अस्थी प्रत्यारोपणासाठी जेजे रुग्णालय (मुंबई), ससून रुग्णालय (पुणे), मिरज किंवा केईएल हॉस्पिटल (बेळगाव) येथे रुग्णांना जावे लागते.
------------
कोट
सीपीआरमध्ये मॉड्युलर ओटीचे काम सुरू आहे. मोठ्या तांत्रिक सुविधांची जोडणी करावी लागत आहे. ते काम लवकरच पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार येत्या दोन महिन्यांतही सुविधा येथे होईल. तूर्त मेंदू व किंवा अस्थी विकारांशी संबंधित शस्त्रक्रिया येथे होतात. अतिगंभीर रुग्णांना बाहेर जावे लागत असेल, तर तशा शस्त्रक्रिया ही येथे व्हाव्यात, यासाठी योग्य ती सामुग्री येथे आणू. त्याही शस्त्रक्रिया येथे होतील, यासाठी जरूर प्रयत्न करू.
- डॉ. प्रदीप दीक्षित, अधिष्ठाता राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63814 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..