
जलसंपदा बैठक- मंत्री जयंत पाटील
गतवर्षीप्रमाणे धरण साठ्याचे नियोजन
जिल्हाधिकारी रेखावार; जलसंपदा मंत्री पाटील यांनी घेतला आढावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः राधानगरीसह अन्य धरणांतील पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. इतर जिल्ह्यांतील आणि राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीत दिली. मंत्री पाटील यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्यासह विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी यांची व्हीसीद्वारे बैठक घेतली. संभाव्य मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला.
दुपारी दोनच्या सुमारास आयोजित व्हीसीमध्ये कोल्हापूरबाबतची माहिती जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली. गतवर्षीसुद्धा धरणांतील पाण्याचा साठा आणि विसर्ग याबाबतचे अभ्यासपूर्ण नियोजन केले होते. त्याच पद्धतीने याही वर्षी नियोजन केले आहे. राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्यावर जिल्ह्यातील वारणेसह अन्य धरणांतील विसर्ग किती असेल याचीही माहिती घेण्यात येईल. याच पद्धतीने कोयनेसह कृष्णेतील विसर्ग, फुगवटा याचीही माहिती घेतली जात असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यातील आजची स्थिती आणि मॉन्सून सुरू झाल्यानंतर रोजच्या पाणीसाठ्याचे आकडे अपडेट केला जाणार आहे. कृष्णाखोऱ्यात फुगवटा होऊ देणार नाही, यासाठी अभियंत्यांत संवाद होईल, अशी चर्चा बैठकीत झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.
कर्नाटकशी समन्वय
जिल्हा, राज्य आणि कर्नाटकशी समन्वयाबाबत चर्चा झाली. लवकरच विभागीय आयुक्त सौरभ राव कर्नाटकातील अधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री पाटील हेसुद्धा कर्नाटकातील मंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
पूरस्थितीचा अहवाल देणार
कोल्हापूर ः जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत कोणकोणत्या ठिकाणी आपत्ती आली याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तहसीलदारांकडून ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली जाईल. त्यानंतर ती सात जूनला आयोगाला पाठविणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. जिल्ह्यात दोन वर्षांत महापूर आल्याने काही ठिकाणी भूस्खलन झाले. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले. प्रापंचिक साहित्य, शेती, जनावरे यांचेही मोठे नुकसान झाले. नेमकी कोणत्या ठिकाणी आपत्ती आली त्यामुळे सार्वजनिक जीवनावर किती आणि कसा परिणाम झाला याचीही माहिती संकलित केली जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63864 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..