
तुफान वाऱ्यासह गारांचा पाऊस
नुसत धुतलं!
तासभराच्या पूर्व मौसमी पावसाने उडाली दैना
सोसाट्याचा वारा अन् गाराही,
शहर पुन्हा तुंबले, वीजपुरवठाही खंडित
वाहनांसह घरांचे मोठे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह पाऊस कोसळणार हा हवामान विभागाचा अंदाज आज खरा ठरला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास तासभर सोसाट्याच्या वारा आणि गारांसह पूर्व मौसमी पावसाने शहरासह जिल्ह्याला झोडपले. यातून पुन्हा एकदा शहर तुंबले. सुमारे शंभराहून अधिक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. झाड पडून तीसहून अधिक मोटारींसह तीसहून अधिक घरांचे नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. शाहूपुरी कुंभार गल्लीत पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले. यामुळे शहराची एकच दैना उडाली. सुदैवाने कोठेही जीवितहानी झाली नाही.
पावसाचा अंदाज घेत काही व्यापाऱ्यांनी, टपऱ्यावरील व्यावसायिकांनी दुकानाचे शटर बंद करून सायंकाळी सहा वाजताच घर गाठले. तासभराच्या मॉन्सूनपूर्व पावसाने शहर तुंबले मग पावसाळ्यात शहराची अवस्था काय होईल, याचा अंदाज आज आला. अग्निशमनच्या जवानांनी धाव घेऊन रस्ते खुले करण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरूच असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली.
दरम्यान, शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आहे. अशी व्यवस्था असलेल्या ठिकाणच्या नागरिकांना वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज जाहीर मिळाला होता. चंदगड, आजरा परिसरात वीज पडून धोका होऊ शकतो, याचाही माहिती संबंधितांना सोशल मीडियासह स्थानिकांच्या मदतीने मिळाली होती. या संपूर्ण भागात कोठेही वीज कोसळण्याची घटना घडली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागातून सांगण्यात आले. या अलर्टचा प्रवास करणाऱ्यांवर फारसा परिणाम झाला नसल्याचेही शहरात दिसून आले. बाजारपेठ, मॉल, दुकानांतील खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी कमी असल्याचे दिसून आले.
दुपारी तीनच्या सुमारास आकाश अंधारून आले आणि पाहता पाहता काळ्या ढगांनी आकाश व्यापले. त्याने शहरातील वाहतूक वेगाने सुरू झाली. टपऱ्यावर काम करणाऱ्यांनी प्लास्टिक कागदाने साहित्य झाकण्याची व्यवस्था करण्यास सुरवात केली. दुपारी चारच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला. रस्त्यावरील कचरा क्षणात आकाशाकडे जाताना दिसत होता. दसरा चौक, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी परिसरात पावसाचे वातावरण झाले. साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. अवघ्या दहा-पंधरा मिनिटांत जोराचा पाऊस सुरू झाला आणि अशाच वातावरणात वाऱ्याचा जोर अधिक असल्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. अनेकांच्या घरांच्या छत्रावरील पत्रे उडून गेले. होर्डिंगग्जवरील फ्लेक्स फाटून उडून गेले. अशाच वातावरणात सुरू असलेली शहरातील वाहतूक काही क्षणात ठप्प झाली.
शहरातील सुमारे पन्नासहून अधिक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबले. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पावसाच्या पाण्याचे लोट दिसू लागले. त्याने भक्तांची तारांबळ उडाली. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी मिळेल त्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न केला. महाद्वार रोडवरील टपऱ्याधारकांनी व्यवसायच बंद केला. काहींना रस्त्यावर मांडलेले साहित्य गोळा करण्यात मोठी कसरत करावी लागली.
कुठे काय घडले?
०) आयर्विन ख्रिश्चन चौकात सिग्नलजवळील झाड पडून वाहतूक खोळंबली
०) बाबूभाई परीख पुलापाशी पुन्हा तळे, वाहतूक खोळंबली
०) ताराबाई पार्क येथील डी मार्ट परिसरात फांद्या कोसळल्याने विजेच्या तारा तुटल्या, रस्ता वाहतुकीसाठी बंद
०) शाहूपुरी सहाव्या गल्लीत पाणी घुसल्यामुळे उंबरठ्यांपर्यंत पाणी, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
ं०) गंगावेस ते रेगे तिकटी येथे दुकाने बंद करण्यात आली
०) गंगवेस-रेगे तिकटी परिसरात गटारी तुंबल्यामुळे काही दुकानांमध्ये पाणी शिरले
०) राजारामपुरी जनता बाझार चौकाचे झाले डबके, वाहतुकीचा खोळंबा
०) जिल्हा परिषदजवळ कोपऱ्यावर झाड पडून काही मोटारींचे नुकसान, वाहतूक बंद
०) जयंती नाल्याजवळ झाड पडल्यामुळे एकेरी वाहतूक
०) वडणगे फाट्यावरील पोवार पाणंद झाड कोसळून तासभर वाहतूक ठप्प
०) मेरीवेदर ग्राऊंड परिसरात रस्त्यावर दीड-दोन फूट पाणी साचून
०) गांधी मैदानाचा झाला तलाव, त्याचाही व्हिडिओ व्हायरल
०) राजारामपुरी तेराव्या गल्लीत दीपा गॅस एजन्सीजवळ झाड पडून मोटारीचे नुकसान
०) त्याने महापालिका कर्मचारी अशोक खोत यांच्या घराचे नुकसान
०) जुना वाशी नाका सरनाईक कॉलनी येथे मॅनहोलमधून प्लास्टिकच्या बाटल्यांचा ढीग बाहेर
०) देवकर पाणंदपासून पुढे तलवार चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी
०) झाडे पडल्यामुळे कोल्हापूर-सांगली मार्गावरील वाहतूक विस्कळीत
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64216 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..