
नृ.वाडी : मानवी साखळी उपक्रम
पिवळी पट्टी लोगो-
नृसिंहवाडी
----
शासनाला जाग आणण्याचा निर्धार
नृसिंहवाडी, ता. ३ : येथे ‘सकाळ’च्या महापूरविरोधी मानवी साखळीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तालुक्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, जे जे मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी, तसेच वजीर रेस्क्यू फोर्सच्या पदाधिकाऱ्यांसह अडीचशेहून अधिक पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते.
बसस्थानक परिसरात आयोजन करण्यात आले. माजी आमदार उल्हास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, सामाजिक कार्यकर्ते दादेपाशा पटेल, नृसिंहवाडी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनंतराव धनवडे, माजी उपसरपंच अभिजित जगदाळे, डॉ. किरण आणुजे, डॉ. मुकुंद पुजारी, भाजपचे संजय शिरटीकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सासणे, पंचगंगा प्रदूषण मुक्ती समितीचे सदस्य विश्वास बालीघाटे प्रमुख उपस्थिती होते.
माजी आमदार पाटील म्हणाले, ‘भविष्यात कितीही मोठा महापूर आला तरी शिरोळ तालुका हा विस्थापित होणार नाही. महापूर हा मानवनिर्मित असून तो विषय निकालात काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. तालुक्यातील सर्व पक्षांनी एकत्रित मोट बांधावी.’ यावेळी त्यांनी सकाळच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
भोजे म्हणाले, ‘पाटबंधारे व बांधकाम विभागाच्या गलथान नियोजनामुळे गेली पंधरा वर्षे शिरोळ तालुक्याला महापुराचा फटका बसत आहे. तालुका हा प्रत्येक वर्षी आर्थिक अरिष्टात सापडत आहे.’ माने पाटील म्हणाले, ‘शिरोळसाठी महापुराचा विषय संवेदनशील आहे. मानवी साखळीसारख्या लोकसहभागाच्या माध्यमातून सकाळने हा प्रश्न हाती घेतल्यामुळे या प्रश्नाला गती मिळाली आहे.’
बालिघाटे म्हणाले, ‘अंकली, उदगाव ते राजापूर या अंतरावर फक्त दोन मीटरचा उतार आहे व राजापूर बंधारा ते हिप्परगी धरणापर्यंत सात मीटरचा अधिक उतार आहे. त्यामुळे महापुराचे पाणी विसर्ग न होता शिरोळ तालुका हा नेहमी पाण्यात राहतो.’
सासणे म्हणाले, ‘शिरोळ तालुका हा चळवळींचा तालुका असून सरकारने महापुरासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी. मंत्र्यांनी पर्यटक म्हणून येथे येऊ नये. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.’
शिरटीकर म्हणाले, ‘कर्नाटक व महाराष्ट्र शासनाने योग्य समन्वय साधून महापुराच्या पाण्याचे परिचलन करावे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग समप्रमाणात केल्यास तालुका महापूरमुक्त होईल.’
धनवडे म्हणाले, ‘तालुक्याला महापूर हा नेहमी धडकी भरणारी बाब आहे. महापुराचा सर्वाधिक फटका नृसिंहवाडीला बसतो. व्यापारी व अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यावर शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी.’
जगदाळे म्हणाले, ‘सकाळने महापूर व कोरोना काळात तसेच पंचगंगा प्रदूषणमुक्ती यासाठी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. तालुका महापूरमुक्त होण्यासाठी सकाळच्या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे.’
इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे तुकाराम पवार, युवा सेनेचे प्रतीक धनवडे, यड्रावकर गटाचे नेते प्रवीण आणुजे, शिवसेना शहरप्रमुख गणेश सुतार, अभियंते दीपक कबाडे, दत्तात्रय भोसले, दत्त सोसायटीचे व्हा. चेअरमन सागर आणुजे, उद्योजक हर्षद पुजारी, दयानंद कुमठेकर, सुरेश गवंडी, अश्विन गवळी, सचिन जोंग, योगेश रुकडे, विशाल सोमण, उत्कर्ष बरगाले, सुमित गवळी, अमोल जाधव, सत्यजित सोमण, परमानंद सुंकी, मुजाहिद पटेल, बाळासो कुनुरे, राकेश खिरूगडे, देवस्थानचे माजी अध्यक्ष शशिकांत पुजारी उपस्थित होते. डॉ. जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, डॉ. सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस एस आडमुठे, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. एस. बी. पाटील, महाविद्यालयाचे डीन स्टुडंट्स प्रा. पी. पी. पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. ए. चौगुले व सर्व स्वयंसेवक यांचे विशेष सहकार्य लाभले. संयोजनासाठी गणेश शिंदे, राजकुमार चौगुले, डी. आर. पाटील, अनिल केरीपाळे यांनी परिश्रम घेतले. स्वागत जितेंद्र आणुजे यांनी केले. कवी दर्शन वडेर यांनी आभार मानले.
...
चौकट
अलमट्टी हटाव..
शिरोळ तालुका बचाव..
यावेळी ‘अलमट्टी हटाव शिरोळ तालुका बचाव’ या घोषणेने बसस्थानक परिसर दणाणून गेला. उपस्थितांनी वज्रमूठ आवळून शासनाला जाग आणण्याचा निर्धार केला. शिरोळ तालुक्यातील महापुराला कर्नाटकातील अलमट्टी धरणच कारणीभूत असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली.
चौकट
विद्यार्थ्यांचे प्रभू दत्तांना साकडे...
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापूर येऊच नये. ‘कृष्णा-पंचगंगा नदीकाठ महापूरमुक्त होऊ दे..’ अशी प्रार्थना नृसिंहवाडीतील मानवी साखळीत सहभागी झालेल्या जयसिंगपूर येथील जे जे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रीदत्त चरणी मंदिरात केली. ‘सकाळ’च्या उपक्रमाला आमचीही साथ असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64421 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..