
पान २
26963
गोवा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सत्कार करताना अॅड. संतोष मळवीकर, शिवाजीराव पाटील. शेजारी नामदेव पाटील, शांताराम पाटील, नागेश चौगुले आदी.
गोव्यात येणारा पर्यटक देवासमान
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यटक लूट प्रकरणी चंदगडवासीयांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ५ ः चंदगड तालुक्यातील तरुणांना गोवा येथे जबर मारहाण करून लूटमार करण्यात आली. गोवा सरकारने हे प्रकरण गंभीरपणे घेतले असून संशयितांना पकडण्याबरोबरच कायदेशीर कारवाईचे धाडसत्र सुरू केले आहे. याच मुद्यावर आज त्यांनी चंदगडकरांना आपल्या दालनात चर्चेसाठी बोलावले होते. तासभराच्या चर्चेत घडलेल्या घटनेबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. गोव्यात येणारा पर्यटक आमच्यासाठी देवासमान असून त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण तयार करण्याचे आश्वासन दिले.
या प्रकरणी आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते अॅड. संतोष मळवीकर यांनी पर्यटकांना येणाऱ्या समस्यांबाबत मांडणी केली. गोवा पोलिसांकडून महाराष्ट्रातील पर्यटकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. ‘एमएच’ नंबरप्लेट असलेल्या वाहनांचीच कसून चौकशी होते. किरकोळ कारणावरून कारवाई केली जाते. शिवाय विशिष्ट सेवा देताना पर्यटकांना जाणीवपूर्वक अडचणीत आणून नंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात. हे प्रकार थांबायला हवेत, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी चंदगडकरांबाबत घडलेला प्रकार निंदनीय असून, असे प्रकार यापुढे होऊ नयेत, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असल्याचे सांगितले. याबाबत सर्व विभागांची बैठक घेऊन स्वतः मार्गदर्शन केल्याचे सांगितले. त्याबाबत लवकरच नवी नियमावली लागू करू. इथे येणारा पर्यटक आमच्यासाठी देवासमान आहे. त्याला त्रास न होता तो समाधानाने निसर्गाचा आस्वाद घेऊन घरी आनंदाने जाईल याची खबरदारी घेऊ, असे आश्वासन दिले.
भाजपचे प्रदेश सदस्य शिवाजीराव पाटील, तालुका अध्यक्ष नामदेव पाटील, शांताराम पाटील, रवींद्र बांदिवडेकर, नागेश चौगुले, राहुल शिरकोळे, अंकुश गवस, लक्ष्मण गावडे, बापूसाहेब शिरगावकर, परशराम पवार, परशराम मळवीकर, संतोष सुतार, जानबा गावडे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64923 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..