
हिरे कंपनीच्या माध्यमातून चंदगडच्या तरुणांना रोजगार
26778
संभाजीराव देसाई
हिरे कंपनीच्या माध्यमातून
चंदगडच्या तरुणांना रोजगार
---
संभाजीराव देसाई; कामाला प्रत्यक्ष सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ७ : अडकूर-इब्राहिमपूर मार्गावर ओमसाई काजू कारखाना साईट येथे ‘अव्यय’ हिरे कंपनी सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी कच्च्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम केले जाईल. या कंपनीच्या माध्यमातून सुरुवातीला किमान २०० जणांना रोजगार उपलब्ध होईल. त्यानंतर कुशल मनुष्यबळ तयार करून त्याचा विस्तार केला जाणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी सांगितले. कारखाना कार्यस्थळावर पत्रकार परिषदेत त्यांनी या व्यवसायाचे भवितव्य मांडले.
श्री. देसाई म्हणाले, ‘‘तालुक्यात बेरोजगारी वाढत आहे. कोरोना काळात आणि त्यानंतरही अनेकांचे रोजगार हिरावले गेले. अशा वेळी त्यांच्या हातांना काम देण्यासाठी आपण काही योगदान देऊ शकू का? असा विचार मनात घोळत होता. त्याचवेळी हिरे कंपनी सुरू करण्याचे सुचले. या क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिकांशी बोलणे झाले. त्यांनीही सहकार्याचा हात पुढे केला. त्यामुळेच हे काम प्रत्यक्षात आले आहे. आपल्याला या क्षेत्राचा २० वर्षांचा अनुभव आहे. त्या माध्यमातून या व्यवसायातील अनेक दिग्गज मदतीसाठी तयार आहेत. हिरे उद्योग हा मुंबई, भिवंडी, पालनपूरनंतर गुजरातमधील सुरतमध्ये फैलावला. उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने हा उद्योग ग्रामीण भागापर्यंत पोचत आहे. त्याचाच लाभ घेण्याचा प्रयत्न आहे. यात काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या कुशलतेनुसार मेहनताना दिला जातो. सुरुवातीला अकुशल मजुरांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन प्रशिक्षक नियुक्त केले आहेत. किमान तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर कुशल मजूर तयार होतात. इथल्या गरजेनुसार त्यांना इथे रोजगार मिळेल. ज्यांना या क्षेत्रात कुशलता प्राप्त करून अन्यत्र नोकरी करायची असेल, त्यांच्यासाठी अविरत प्रशिक्षणाची सोय केली जाणार आहे. तालुक्यातील बेरोजगार, होतकरू तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64924 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..