
कारणे दाखवा
27207
पोवार, उलपे यांना
कारणे दाखवा नोटीस
-------------
प्रशासकांची कारवाई ; नालेसफाईच्या सूचनांकडे दुर्लक्ष
कोल्हापूर, ता. ६ ः मार्चपासून नाले सफाई सुरू झाल्यापासून केवळ चारवेळा कामांना भेटी दिल्या. दिलेल्या सूचनांचे अभिप्राय नोंदवलेले नाहीत. सूचनांकडे दुर्लक्ष तसेच नाला सफाई कामावर नियंत्रण नसल्याचे दिसून आल्याने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणीदरम्यान मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांना खडे बोल सुनावले. याबाबत पोवार व कीटकनाशक अधिकारी स्वप्नील उलपे यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली. तीन दिवसांत खुलासा केला नाही तर पुढील कारवाईचा इशारा दिला आहे.
नाला सफाईतून योग्य काम झाले नसल्याचे दिसून आले होते. विविध बैठकांत चर्चा झाली होती. विविध पक्ष, संघटनांनीही वस्तुस्थिती दाखवली होती. त्यानुसार प्रशासक डॉ. बलकवडे यांनी सूचनाही केल्या होत्या. त्याबाबत काहीच बदल झाला नसल्याचे झालेल्या पावसामुळे दिसून आले. या पार्श्वभूमीवर आज प्रशासक डॉ. बलकवडे यांनी रिलायन्स मॉल, कामगार चाळ व गाडी अड्डा या ठिकाणी नाला सफाईच्या कामाची पाहणी केली. गाळ उठावाचे काम योग्य नसल्याचे दिसून आले. नाल्यात कचरा व प्लास्टिक आढळून आले. गाडी अड्डा व रिलायन्स मॉल मागे काढलेला गाळ उठाव केलेला नाही. नोंदवहीत कामांबाबत कोणत्या सूचना दिल्या, याबाबत अभिप्राय नाहीत. कामांस सुरूवात करताना, सुरू असताना व संपल्यानंतर नोंदवहीत नागरिकांचा अभिप्राय घेणे आवश्यक होते. सूचनांकडे दुर्लक्ष व नाला चॅनेल सफाई कामावर नियंत्रण नसल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे.
प्रशासकांनी केली पाहणी
लक्ष्मीपुरी येथील गाडीअड्डा, व्हिनस कॉर्नर व रिलायन्स मॉलजवळील नाला सफाईची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी केली. गाडीअड्डा येथे काढलेला गाळ उठाव करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिल्या. व्हिनस कॉर्नर येथील चॅनेल, रिलायन्स मॉलजवळील मेन चॅनेल व मॉलच्या पाठीमागील नाल्याची पाहणी केली. भिवटे चेंबर्स ते धान्य मार्केट येथील मेन चेंबर्सची सफाई झाली नसल्याने ती करून घ्यावी अशी सूचना दिली. या वेळी उपशहर अभियंता बाबूराव दबडे, नारायण भोसले, आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65390 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..