
पेरणीसाठी धांदल सुरु
मॉन्सून शक्यतेने पेरणीची धांदल
जिल्ह्यात ३९ हजार ९७१ क्विंटल बियाण्यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मॉन्सून पूर्व पावसाने आणि काही दिवसांत जिल्ह्यात मॉन्सून दाखल होण्याच्या शक्यतेने जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीसाठी धांदल उडाली आहे. जिल्ह्यात भात, ज्वारी, तूर, भुईमूग, उडीद, सोयाबीन व मक्याची ३९ हजार ९७१ क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. याचा पुरवठा योग्य व्हावा, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून पाठपुरावा केला जात आहे. बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
जिल्ह्यात या वर्षीच्या खरिपासाठी आवश्यक असणारे बियाण्यांपैकी १५ हजार ५० क्विंटल बियाण्यांचे पुरवठा झाले आहे. याशिवाय १ लाख ७० हजार टन खतांची मागणी आहे. यात सर्वाधिक खत युरिया, एमओपी, एसएसपी, डीएपीसह इतर खतांची मागणी आहे. या वर्षी युरियाची मागणी ६० हजार ९२० टन, एमओपी
२० हजार १६१ टन, सिंगल सुपर फॉस्फेट १४ हजार टन, ‘डीएपी‘ २१ हजार ५३० टन याशिवाय इतर खतांची मागणी केली आहे. दरम्यान, युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या पुरवठ्यावर मर्यादा येणार असल्याने खरिपाच्या दुसऱ्या टप्प्यात खतांची टंचाई जाणवणार आहे. या वर्षी शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये यासाठी दक्षता पथकही तैनात राहणार आहे. एखाद्या शेतकऱ्याला बोगस बियाणे मिळाले तर त्या बियाणे विक्रेते किंवा कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली जाणार आहे. गेल्या पूरस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांनी शक्यतो या वर्षी नदी काठी किंवा मळीच्या शेतात भात किंवा इतर बियाण्यांची पेरणी टाळली आहे. माळरानातील किंवा पठारावरील भात, भुईमूग व सोयाबीनच्या पेरण्यांनी गती घेतली आहे.
* बियाणे विक्रीचे नियोजन
जिल्ह्यात १ हजार ६६८ बियाणे विक्रेते आहेत. तर, १५८१ खत विक्रेते व ४६ उत्पादक आहेत. कीटकनाशक उत्पादकांची संख्या २ असून ७५६ विक्रेते आहेत. दरम्यान, कोणत्याही कृषी सेवा केंद्राकडून चुकीचे किंवा बोगस बियाण्यांची विक्री करू नये, असे आवाहन कृषी अधीक्षक कार्यालयाकडून केले आहे.
.....
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65407 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..