
जनता दलाकडून बगलबच्च्यांना गाळे ः सय्यद व बन्नेंचा आरोप
27687
गडहिंग्लज : बेकायदा गाळेप्रश्नी कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या वतीने बुधवारी पालिकेवर धडक देऊन जोरदार घोषणा दिल्या.
जनता दलाकडून बगलबच्च्यांना गाळे
सय्यद व बन्नेंचा आरोप; बेकायदा गाळेप्रश्नी राष्ट्रवादीची पालिकेवर धडक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : नगरपालिकेतील तत्कालीन सत्ताधारी जनता दलाने स्थायी समितीच्या ठरावाद्वारे आपल्या बगलबच्च्यांना सांभाळण्यासाठी स्वच्छतागृह पाडून व भाजी मंडईचा रस्ता बंद करून आजरा रोडलगत दुकानगाळे बांधून दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हारुण सय्यद व शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने यांनी केला.
आरक्षण क्रमांक १४ मधील बेकायदा दुकान गाळ्यांची चौकशी करून संबंधित दोषीवर फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादीने पालिकेवर धडक दिली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रश्नी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
या वेळी सय्यद म्हणाले, ‘‘भाजी मंडईसाठी लिलाव हॉलसाठीचा रस्ता बंद करून व स्वच्छतागृह पाडून तत्कालीन सत्ताधारी जनता दलाने तेथे गाळे बांधलेत. त्याला नगररचना विभागाची मंजुरी नाही. भाडेपट्टी ठरविली नाही. सर्वसाधारण सभाऐवजी स्थायी समितीत त्याचा ठराव केला. नंतर सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तात ठराव घुसडला असण्याची शक्यताही आहे. त्याला आमचा विरोध आहे. शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. पाच वर्षे महिला नगराध्यक्ष असूनही महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधाही केली नाही, याचे दुर्दैव आहे.’’
बन्ने म्हणाले, ‘‘जनता दलाने सत्तेचा गैरवापर करून स्थायी समितीच्या ठरावाद्वारे गाळे उभारले आहेत. या परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहन जाण्यासाठी साधा रस्ताही नाही. बगलबच्च्यांच्या सोयीसाठी हे गाळे उभारले असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.’’ युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुंडू पाटील म्हणाले, ‘‘हेच गाळे गोरगरीब गरजूंना दिले असते तर ते आम्ही मान्य केले असते. परंतु राजकारणासाठी आपल्या मागे फिरणाऱ्या बगलबच्च्यांना जनता दलाने गाळे दिले आहेत. त्यात अधिकारीही सामील आहेत. त्याची चौकशी व्हावी.’’
मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांना निवेदन दिले. ठराव आणि लिलावाची प्रक्रिया कागदोपत्री रंगवून आपल्याच मर्जीतल्यांना या बेकायदा गाळ्यांचे वाटप केले असून त्याची चौकशी करुन त्याला जबाबदार सर्वांवर फौजदारी करावी. पूर्वीप्रमाणे येथे सुसज्ज स्वच्छतागृह उभारावे व रस्ता खुला करण्याची मागणीही निवेदनातून केली आहे. या वेळी किरण कदम, उदय जोशी, वसंत यमगेकर, महेश सलवादे, अमर मांगले, बाळासाहेब घुगरे, रमजान अत्तार, रश्मीराज देसाई, शारदा आजरी, स्वप्नील गुरव, शितल माणगावे, चिंतामणी वाली, पूनम म्हेत्री, पापा गाडवी, अविनाश ताशिलदार, राहुल शिरकोळे आदी उपस्थित होते.
--------------------
चौकट...
आठ दिवसांत लेखी उत्तर
मुख्याधिकारी खारगे म्हणाले, ‘‘आठ दिवसांत या संबंधित झालेल्या ठरावांचा अभ्यास करून चौकशी करण्यात येईल. त्यानंतर केलेल्या कार्यवाहीचे लेखी उत्तर दिले जाईल.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65920 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..