
शहरातील नालेसफाईचा फार्स
लोगो ः सकाळचे आहे लक्ष
-
फोटो
28103, 28101
-
शहरात नालेसफाईचा फार्सच
कृती समिती, मनपा अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीतून उघड, नाल्यांची रुंदीही घटली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः शहरातील नाले सफाईचे आकडे महापालिका प्रशासनाने जाहीर केले; मात्र आज कृती समितीने जयंती नाल्याची पाहणी केली. यावेळी रामानंदनगर, यल्लम्मा मंदिर, हॉकी स्टेडियम या भागात नाल्याची सफाई, खोलीकरण झाले नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच ओढा त्याच्या मूळ रुंदीपेक्षा कमी झाल्याचेही दिसले. नाल्यांमध्ये जेथे संरक्षक भिंत बांधली आहे ती काही ठिकाणी अपूर्ण असल्याचे दिसले. त्यामुळे जयंती नाल्याच्या बाबतीत तरी नाले सफाई हा फार्स असल्याचे दिसून आले. येथील नागरिकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली.
शहरात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी महापालिका प्रशासनाने काय तयारी केली आहे, याचा आढावा घेणारी बैठक बुधवारी (ता. ८) महापालिकेमध्ये झाली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये नाले सफाईचे काम बहुतांश पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य निरीक्षकांनी दिली होती. त्यानंतर कृती समिती आणि महापालिका अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नाले सफाईची पाहणी व नाल्याची रुंदी तपासण्याचे निश्चित झाले. त्यानुसारआज सकाळी अकरा वाजता कृती समितीचे ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दुर्गेश लिंग्रस हे सहायक नगररचना संचालक आर. आर. महाजन यांच्या दालनात गेले. तेथे त्यांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नकाशाच्या आधारे जयंती नाल्याच्या उगमापासून पंचगंगा नदीपर्यंतची ठिकठिकाणीची रुंदी मोजली. तसेच १९३९ च्या सर्वे नकाशावरून त्याकाळी या नाल्याची रुंदी किती होती, याचीही माहिती घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात झाली.
माजी उपमहापौर भूपाल शेटे, माजी नगरसेवक अनिल कदम, बाबा पार्टे, दिलीप देसाई, नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनील भाईक, उमेश बागूल, सर्व्हेअर अर्जुन कावळे, रमाकांत कांडगावकर हे अधिकारीही उपस्थित होते.
पाचगाव पूल
पहिल्यांदा पाचगाव रोडवरील पुलावर जाऊन पाहणी करण्यात आली. येथे ओढ्याच्या पात्रातील रुंदी मोजली. यावेळी नाल्याच्या पाठीमागच्या बाजूला पात्र थोडे अरुंद झाल्याचे दिसले. तसेच येथे ओढ्यालगतच घरे झाली असून, त्यांचे सांडपाणी ओढ्यात जात असल्याचे दिसून आले. येथेही ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचरा पडल्याचे दिसून आले. येथे कोणत्याही प्रकारची सफाई केली गेली नसल्याचे येथील नागरिकांनीही सांगितले.
रामानंदनगर पूल
ओढ्याला रामानंदनगरच्या पुलाजवळ संरक्षक भिंती अर्धवट बांधली असून, पुलाच्या पुढे पुन्हा नाल्याचे पात्र अरुंद झाल्याचे दिसून आले. रामानंदनगरच्या ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याचे दिसून आले. येथेही नाले सफाई झाली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. पुलाचे गाळे गाळ साचल्याने बंद झाले असून, एका गाळ्यातूनच पाणी वहात असल्याचे दिसले. या ओढ्यात नाल्याला लागून काही दुकाने आहेत. येथेही ओढ्याच्या पात्राची लांबी मोजण्यात आली.
यल्लम्मा मंदिर पूल
येथील ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचरा दिसून आला. हा कचरा पुलाच्या गाळ्यांमध्येच अडकलेला होता. इथेही गाळ साठलेला असून, सफाई झाली नसल्याचे दिसून आले. नुकत्याच झालेल्या पावसामध्ये येथील एक झाड ओढ्यात उन्मळून पडले; मात्र अद्याप ते काढलेले नाही. यल्लम्मा मंदिराच्या पिछाडीस ओढ्याच्या पात्रातच एक भिंती बांधल्याचे दिसते. यल्लम्मा मंदिर पुलाच्या पुढच्या बाजूला ओढ्याचे पात्र आणखी अरुंद झाल्याचे दिसले.
आरोग्य अधिकाऱ्यांची खरडपट्टी
यल्लम्मा मंदिर पुलावर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. त्यांनी नाले सफाई केल्याचे सांगितले. यावेळी पार्टे, अनिल कदम आणि ॲड. इंदुलकर यांनी त्यांना धारेवर धरले. सफाई केली तर हा कचरा कोठून आला? गाळ काढला तर ओढ्याचे पात्र उकरलेले कसे दिसत नाही. या प्रश्नांची उत्तरे मात्र त्यांना देता आली नाहीत.
नियम फक्त कागदावरच
ओढ्यामध्ये किंवा नाल्यामध्ये संरक्षक भिंत असेल तर पात्रापासून ६ मीटर अंतरावर बांधकाम करण्यास परवानगी असते, तर संरक्षक भिंत नसेल तर ९ मीटर अंतरावर बांधकाम करायला परवानगीही असते; मात्र हा नियम कागदावरच असून, ओढ्यालगत बांधकाम केले असल्याचे दिसून आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66352 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..