
गोडसाखर वार्षिक सभा
‘गोडसाखर’ देणार की ठेवणार?
आज विशेष सभा; विरोधाच्या पार्श्वभूमीवर सभेकडे शेतकरी, कामगारांचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना (गोडसाखर) भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याच्या विषयावर उद्या (ता. ११) विशेष सर्वसाधारण सभा होत आहे. या विषयाला होणारा विरोध आणि समर्थनातील गट समोरासमोर येणार असल्याने कडक पोलिस बंदोबस्त ठेवले आहे. गोडसाखर चालवायला देणार की जैसे थे राहणार, याकडे सभासदांसह तालुक्याचे लक्ष आहे.
प्रशासकीय मंडळाकडे कारखान्याची सूत्रे आहेत. मुख्य प्रशासक तथा विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी आपल्या अधिकारात कारखाना चालवण्यास देण्याच्या एकाच विषयावर विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. त्यानंतर लगेचच माजी अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्यासह काही संचालकांनी निवेदन देऊन या सभेवर आणि एकच विषय ठेवण्यावर आक्षेप नोंदवला. निवडणुकीनंतर येणाऱ्या संचालक मंडळाकडूनच ही कार्यवाही व्हावी असे मत व्यक्त केले. त्यावर कामगारांनी कारखाना चालवण्यास देणेच योग्य असल्याचा पलटवार केला आहे. विरोधी बारा संचालकांतील प्रमुख डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी स्वतंत्र भूमिका मांडत कारखान्याचा ताळेबंद व आराखडा सभासदांसमोर ठेवूनच सभा घेणे आवश्यक आहे. अन्यथा विरोध असल्याचे स्पष्ट करून निवडणुकीनंतर नव्या संचालक मंडळाकडून कारखाना चालवण्यास देणे योग्य होईल, असे मत नोंदवले आहे.
दरम्यान, काही दिवसापूर्वी चंदगड मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाल्याचे समजते. त्यात कारखाना चालवण्यास देण्याला विरोध करण्यावर एकमत झाल्याचीही चर्चा आहे. मुळात कागल व चंदगड मतदारसंघातील कार्यकर्त्यांत पडलेल्या फुटीच्या चर्चेवर गोडसाखरची सभा शिक्कामोर्तब करणारी ठरणार आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीयदृष्ट्या ही घटना महत्त्वाची ठरणार आहे. विरोधी गटातील संचालकांचीही सभेच्या समर्थनार्थ नियोजन केल्याची चर्चा आहे. विषय मंजूर करण्याच्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. आता प्रत्यक्ष सभेतच प्रत्येक गटाची खरी भूमिका उघड होणार असून भविष्यातील राजकीय कंगोरे स्पष्ट करणारी ही सभा असेल.
पोलिस बंदोबस्त
विरोध व समर्थनार्थ असलेल्या गटातील वाढलेली ईर्षा लक्षात घेता कारखान्याच्या साईटवर सर्वसाधारण सभेला दोन पोलिस उपनिरीक्षक व २० पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली असून प्रत्येक सभासदाचे ओळखपत्र व नोटीस तपासूनच सभेला प्रवेश दिला जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66660 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..