
मतदानासाठी ३१ मे अखेरचे मतदार पात्र
मतदानासाठी ३१ मे अखेरचे मतदार पात्र
नगरपालिका निवडणूक; २१ जूनला प्रसिद्ध होणार प्रारुप यादी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : राज्यातील २०८ नगरपरिषदा आणि १३ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३१ मे अखेरची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. विधानसभेच्या मतदार यादीनुसार प्रभागनिहाय मतदार संख्या निश्चित करून ही प्रारुप यादी २१ जूनला प्रसिद्ध करण्याचे आदेश आज निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. या मतदार यादीवर २७ जून अखेर हरकती नोंदवायच्या असून १ जुलै रोजी प्रभागनिहाय, तर ५ जुलै रोजी केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.
एप्रिल २०२० ते जून २०२२ अखेर मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळात केंव्हाही जाहीर होणार आहेत. निवडणूक होणाऱ्या राज्यातील २०८ मध्ये जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल, गडहिंग्लज, वडगाव, पन्हाळा, मलकापूर, कुरुंदवाड, मुरगूड या नऊ नगरपालिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकही नगरपंचायतीची निवडणूक या कालावधीत नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन टप्प्यातील अंतिम प्रभाग रचनेचा टप्पा पूर्ण झाला आहे. प्रभागनिहाय मतदार यादींचे विभाजनाची प्रक्रिया आता जाहीर झाली असून आता फक्त प्रत्यक्ष निवडणुकीचाच टप्पा शिल्लक राहिला आहे. परंतु प्रभाग रचना, आरक्षण आणि मतदार यादीचा कार्यक्रम जितक्या गतीने घेतला आहे, तितक्याच गतीने आता निवडणुकीचीही चर्चा सुरू झाली आहे. परंतु पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीविषयी संभ्रमावस्था आहे.
प्रभागनिहाय मतदारांचे विभाजन करताना खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत. विधानसभा मतदार यादीवरुन प्रभागनिहाय यादी तयार करताना दोन्हीतील मतदारांची संख्या समान आहे की नाही हे तपासण्यात येईल. प्रभागातील सर्व मतदारांचा समावेश असेल आणि हद्दीबाहेरील एकही मतदार ज्या-त्या प्रभागात असणार नाही याकडे कटाक्ष पाळण्याच्या सूचना आहेत.
हरकतींवर याच सुधारणा होतील
प्रारुप यादी प्रसिद्धीनंतर त्यावर प्राप्त हरकती संदर्भात निर्णय घेताना केवळ लेखनिकांच्या काही चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाले असल्यास सुधारणा करण्याची आणि विधानसभा मतदार यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव वगळले असल्यास अशा मतदारांची नावे प्रभागाच्या मतदार यादीत नोंदवण्याच्याही सूचना आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66706 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..