डॉ. आ. ह. साळुंखे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. आ. ह. साळुंखे
डॉ. आ. ह. साळुंखे

डॉ. आ. ह. साळुंखे

sakal_logo
By

लीड
आपल्या चिंतन, लेखन आणि भाषणांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ विचारवंत, प्राच्चविद्यापंडित, लेखक, संशोधक
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या वयाच्या ८० व्या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कृतज्ञता समारंभप्रसंगी प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड लिखित ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हे डॉ. साळुंखे यांचे पहिलेच जीवनचरित्र प्रकाशित होत आहे. त्यानिमित्त...
- प्रा. डॉ. सुजय बाबूराव पाटील, मराठी विभाग, कमला कॉलेज, कोल्हापूर.

बहुजनांची अस्मिता तेवत ठेवणारे डॉ. आ. ह. साळुंखे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कृतज्ञता पर्वामुळे अवघा महाराष्ट्र शाहूमय झाला आहे.
या पार्श्वभूमीवर राजर्षींच्या विचारांचा वारसा जपणारे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन कोल्हापुरात होत आहे. ही परिवर्तन चळवळींच्या वाटचालीतील ऐतिहासिक नोंद म्हणावी लागेल. या ग्रंथात डॉ. साळुंखे सरांचे बालपण, शैक्षणिक जडणघडण, सहजीवन, इतिहास पुनर्लेखनात त्यांनी दिलेले योगदान, त्यांचे धर्मचिंतन, विविध महापुरुषांविषयी त्यांनी घेतलेली भूमिका, बौद्ध ग्रंथ लेखन, त्यांनी सांगितलेला बहुजनांच्या संघर्षाचा इतिहास आणि पराभवाची कारणे, परिवर्तनाच्या चळवळींची दिशा, संत साहित्यविषयक योगदान, अशा विविधांगांनी त्यांच्या व्यक्तित्व आणि वाङ्‌मयाने कर्तृत्वाचा वेध चरित्रकार
प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड यांनी तपशिलाने घेतला आहे. डॉ. साळुंखे यांना शब्दात पकडणे हे एकट्या-दुकट्याचे काम नाही, तर अनेक लोकांनी मिळून अनेक वर्षे करण्याचे हे काम आहे, असे जरी चरित्रकाराने म्हटले असले तरी ग्रंथाद्वारे डॉ. साळुंखे सर यांच्या वाङ्‌मयाचा, विचारांचा आणि व्यक्तित्वाचा शोध कोणत्या दिशेने करता येऊ शकतो, याची एक समृद्ध पाऊलवाट येथे शोधली आहे.
डॉ. साळुंखे यांनी मराठा आणि एकूणच भारतीय समाजाला एकविसाव्या शतकाला सामोरे जाताना कोणती मानसिकता व दृष्टी स्वीकारावी, या मतांचा चरित्रकाराने सदर ग्रंथात केलेला ऊहापोह महत्त्वाचा वाटतो. ‘भारतीय महापुरुषांच्या इतिहासाकडे प्रस्थापितांच्या नजरेने न पाहता स्वतःच्या नजरेने पाहण्याची डॉ. साळुंखे यांनी दिलेली दृष्टी इतिहासद्रोह रोखणारी आहे. भारतीय संस्कृतीचे खरेखुरे दर्शन घडवून मानव म्हणून सर्वांनाच समृद्ध बनविणारे आहे.’
‘कोणत्याही चळवळीत काम करणारा कार्यकर्ता असो, एखादा कलावंत असो, त्याच्या एका हातात खङ्‌ग आणि दुसऱ्या हातात फुल हवे,’ ही डॉ. साळुंखे यांनी प्रतीकातून व्यक्त केलेली भावना बोलकी आहे. हे सप्रमाण पटवून देताना चरित्रकाराने डॉ. साळुंखे यांच्या चिंतनाचे जागोजागी दाखले दिले आहेत.
गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आणि त्यावर सोप्या पद्धतीने डॉ. साळुंखे यांनी केलेले मार्मिक भाष्य हे गौतम बुद्ध समजून घेणाऱ्यांसाठी पर्वणीच आहे. यासंदर्भातील अनेक दाखले देऊन चरित्रकाराने डॉ. साळुंखे यांच्या बौद्ध तत्त्वज्ञानाच्या चिंतनाची पाणपोई वाचकांसमोर मांडून ठेवली आहे असे वाटते.
आज दुर्दैवाने भारतीय राजकारण धर्मांधतेकडे वळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. साळुंखे यांनी हिंदू-मुस्लिम जनतेला जागे करताना मांडलेल्या विचारांचा मागोवादेखील या ग्रंथात घेतलेला आहे आणि तो आजच्या काळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा वाटतो.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66845 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top