
निवडणूक कामाला वेग
शहरातील ओबीसींची माहिती संकलित
लवकरच आयोगाकडे पाठवणार; प्रभागनिहाय मतदार यादी १७ ला होणार जाहीर
कोल्हापूर, ता. १२ ः महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादीचे काम सुरू असून, शुक्रवारी (ता. १७) प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, ओबीसींबाबतची प्रभागनिहाय माहिती संकलित झाली असून, आकडेवारी अंतिम करण्याचे काम सुरू आहे. दोन ते तीन दिवसात राज्याच्या आयोगाकडे पाठवली जाणार आहे. उद्या (ता. १३) प्रभाग आरक्षणावर आलेल्या हरकतींचा विचार करून अंतिम प्रभाग आरक्षण गॅझेटमध्ये प्रसिद्ध केले जाईल.
महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय मतदार यादीचे काम ६ जूनपासून सुरू केले. ज्या सहा प्रभाग रचनेत बदल झाले आहेत, त्या ठिकाणी प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. हरकतींचा विचार करून अंतिम प्रभाग रचनेत जे भाग वगळले अथवा वाढवले त्या भागातील मतदारांची नावे वगळणे, वाढवण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर वापरण्यात येणार असून, प्रारूप मतदार यादी त्याच्या साहाय्याने बनवली जाणार आहे. १७ जूनला प्रत्येक प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
या कामाबरोबरच ओबीसींची माहिती संकलनाचे काम सुरू होते. बीएलओंच्या माध्यमातूनच हे काम केले असून, जवळपास सर्व माहिती संकलित झाली आहे. त्या माहितीवर अखेरचा हात फिरवला जात असून, आकडेवारी अंतिम झाली की राज्य सरकारने आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे.
प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना ६ जूनपर्यंत मागवल्या होत्या. त्यानुसार एकच हरकत आली असून, त्यावर विचार करून अंतिम आरक्षण सोडत १३ जूनला गॅझेटमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67243 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..