
पाच लाखांच्या दागिने चोरीचा छडा
फोटो २८९५५
दागिने चोरीचा दोन दिवसांत छडा
संशयित महिलेस अटक; १० तोळे जप्त
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाचे १० तोळे सोन्याचे दागिने चोरीचा शाहूपुरी पोलिसांनी दोन दिवसांच्या आत छडा लावला. याप्रकरणी सविता केरू चौगले (वय २८, मूळ रा. सांगली, सध्या रा. हातकणंगले) या संशयित महिलेला अटक केली. तिच्याकडून सुमारे पाच लाख किमतीचे दहा तोळे सोन्याचे दागिने जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की निपाणीत राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिका शनिवारी चिपळूणहून कोल्हापुरात आल्या होत्या. त्या पतीसोबत गावी जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात थांबल्या होत्या. त्यांना गडहिंग्लजची एक बस मिळाली. मात्र, ती ताराराणी चौकात बंद पडली. त्यामुळे ते दोघे बसमधून उतरून दुपारी पावणे तीनच्या सुमारास कागलकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होते. दरम्यान, त्याच्या बॅगमधील दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात लंपास केले. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली होती. याचा तपास पोलिस करत होते. दरम्यान, त्यांना हा प्रकार सांगली येथील संशयित चौगले या महिलेने केल्याची माहिती मिळाली. ती हातकणंगले येथे मिळून आली. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून तीन तोळे वजनाचा सोन्याचा हार, चार तोळ्यांचे बिलवर, एक तोळ्याचे वेल आणि कुड्या, एक तोळ्याच्या अंगठ्या नि नऊ ग्रॅमचे अन्य दागिने, असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेश गवळी, ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले, उपनिरीक्षक श्वेता पाटील, कर्मचारी ऋषिकेश पवार, युवराज पाटील, मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, लखन पाटील, सागर माने, महिला पोलिस कर्मचारी शिल्पा आडके यांनी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67483 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..