
सांडपाणी मैदानावर
28913
कोल्हापूर : नाल्याबाहेरून मैदानापर्यंत वाहणारे सांडपाणी.
सांडपाणी नव्या क्रीडांगणावर
सानेगुरुजी वसाहत परिसरातील चित्र; दोन वर्षांपासून चरीची स्वच्छता नाही
कोल्हापूर, ता. १४ : येथील सानेगुरुजी वसाहतीनजीक असणाऱ्या नव्या क्रीडांगणावर परिसरातील सांडपाणी येऊ लागले आहे. मैदानाबाहेर मारलेली चर दोन वर्षांपासून स्वच्छ न केल्यामुळे सांडपाणी मैदान परिसरातून वाहून रस्त्यावर येत आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे हे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येथील नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरणारे आहे. शहरातील नाले सफाईचा दिखावा प्रशासकांच्या भेटीने फसला. त्यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर शहरातील नाले सफाईला सुरवात झाली आहे; मात्र उपनगरातील नागरिक यापासून वंचित आहेत. तीन वर्षांपूर्वी तुळजाभवानी-आपटेनगर या जुन्या प्रभागामध्ये महापालिकेच्या मोकळ्या जागेत मैदान बनवण्यात आले. परिसरातील हे एकमेव मैदान असल्यामुळे याचा फायदा अनेकांना होऊ लागला. आता या मैदानावर वॉकिंग ट्रॅकही बनवण्यात येत आहे. विद्युत खांब बसवले असून, दिवे जोडणी बाकी आहे. स्वछतागृहाचा पायाही बांधून तयार आहे. असे असताना या मैदानासह परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. जीवबानाना जाधव पार्कपासून सुमारे ४० हून अधिक कॉलनीचे सांडपाणी येथील एका तात्पुरत्या चरीतून जाते. दोन वर्षांपासून ही चर स्वच्छ केलेली नाही. त्यातच या चरीत कचरा व अन्य मैला साठून ही चर भरली आहे. त्यामुळे हे सांडपाणी थेट मैदानाच्या गेटबाहेरून वाहत आहे. आणखी थोडा पाऊस झाल्यास हेच पाणी मैदानात व रस्त्यावरून वाहणार आहे. याचा थेट परिणाम मैदानावर येणाऱ्या खेळाडू व नागरिकांसह परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर होणार आहे. शहरातील नाले सफाई होत असतानाच उपनगरातील नागरिकांच्या आरोग्याचाही विचार व्हावा, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.
चौकट
या नाल्यांमध्ये झुडपे वाढली आहेत. झुडपांमुळे कचरा नाल्यांमध्येच तटत आहे. असे होऊन हे नाले तुडुंब भरले आहेत. अखेर या नाल्यांमध्ये गाळ साचून नाल्यांतून वाहणारे पाणी आता नाल्यांबाहेर आले आहे.
कोट
महापालिकेचे सर्व कर रीतसर भरतो. त्यामुळे मनपाने आमच्यासाठीही सुविधा पुरवणे गरजेचे आहे. दोन वर्षांपासून वारंवार तक्रार करूनही कोणीच या समस्येकडे लक्ष दिलेले नाही. नाल्यांची स्वच्छता लवकर करून येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा.
-प्रफुल्ल पाटील, नागरिक.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67526 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..