
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नीलम गोऱ्हेंना साकडे
29009
-----------------------------
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे
नीलम गोऱ्हेंना साकडे
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ, पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे त्यांना साकडे घातले. याबाबत लवकरच महिला बालकल्याण विभागाच्या सचिव स्तरावरील अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याचे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन अत्यल्प आहे. कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा, शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन, भत्ते मिळावेत, पूरक पोषण आहाराची रक्कम तिपटीने वाढवावी, नवीन मोबाईल ट्रॅकर अॅप्लिकेशनसाठी रक्कम द्यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन डॉ. गोऱ्हे यांना दिले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी एम. ए. पाटील, कमल परुळेकर, चेतना सुर्वे, अपर्णा पानसरे यांच्या शिष्टमंडळाने सदरचे निवेदन देऊन डॉ. गोऱ्हे यांच्याशी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. योग्य ती माहिती संबंधित विभागाकडून घेण्यात येईल. त्यासाठी आवश्यकता भासल्यास महिला बालकल्याण विभागाच्या सचिव स्तरावरील अधिकारी व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन डॉ. गोऱ्हे यांनी दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67659 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..