
कोल्हापूर आकाशवाणी
स्थानिक कृषी कार्यक्रमांवर गदा?
कोल्हापूर एफएम आकाशवाणी; १७ पैकी केवळ चारच तास होणार प्रसारण
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः वैविध्यपूर्ण मनोरंजनात्मक तसेच माहितीपर कार्यक्रमांची मेजवाणी देणाऱ्या कोल्हापर एफएम आकाशवाणी केंद्रातील कृषी कार्यक्रम शेतीला बळ देणारे ठरत आहेत. त्यासाठी केंद्रीय कृषी व कृषक मंत्रालयाकडून साडेदहा लाख रुपयांचा निधी कोल्हापूर आकाशवाणी केंद्राला येतो. यातून कृषिप्रधान कार्यक्रम सादर होतात. त्याद्वारे कोल्हापूर आकाशवाणी केंद्राने विशेष लौकीक मिळविला; मात्र येत्या काळात प्रसारणाची वेळ आता १२ तासांवरून चार तासांवर येणार असल्याने स्थानिक कृषी कार्यक्रमांवर गदा येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात ६० टक्के शेती आहे. ४० टक्के शेतीपूरक व्यवसाय आहेत. एकूण अर्थकारणात शेतीचा वाटा ६० टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे शेतीतून चांगले उत्पादन चांगले मिळावे, बाजारपेठेत चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र, राज्य सरकार कृषी विभागातर्फे विविध योजना राबवते. या योजनांची माहिती शेतकऱ्यांना समजावी त्यातून शेतीचे विविध प्रयोग करता यावेत यासाठी आकाशवाणीच्या ‘किसान वाणी’ कार्यक्रमांतून प्रबोधनात्मक तसेच माहितीपर कार्यक्रम प्रसारित होतात.
जिल्ह्यातील कृषी, पशुसंवर्धन, कुकुटपालन, कृषी महाविद्यालय, बी-बियाणे महामंडळ, बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची माहिती तसेच अधिकाऱ्यांच्या मुलाखती, ज्या शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेत यशस्वी शेती केली त्यांच्या यशोगाथा, असे वर्षाला ३०० हून अधिक शेतीविषयक कार्यक्रम आकाशवाणी केंद्राने निर्मिती व प्रसारित केले. याशिवाय हवामानाचा अंदाज, पेरणी व पशुधन लसीकरण या संर्दभातील माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना खबरदारी घेणे शेती मशागतीचे नियोजन करण्यास हातभार लाभला. परिणामी कृषिविषयक कार्यक्रमाला कोल्हापूर व सांगलीतील शेतकऱ्यांचा प्रतिसाद सर्वाधिक आहे.
सायंकाळचे सत्र मुंबईतून
कोल्हापूर आकाशवाणीचे प्रसारण एकूण बारा तासांचे होते. यात ५ तास विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारण असते. एकूण १७ तास प्रसारण कोल्हापूर केंद्रात होते. १ जुलैपासून सायंकाळच्या सत्रातील प्रसारण मुंबईतून होणार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या वाट्याला केवळ चार तासांचे प्रसारण येणार आहे. शेतीविषयक कार्यक्रमांबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्य विश्वातील कार्यक्रम यातील कोणत्याही स्थानिक कार्यक्रमांवर गदा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68212 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..