
स्टार्टअप
२९५३६
कोल्हापूरच्या ‘सिरी’ स्टार्टअपचा डंका
आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; भारत आणि क्रोएशियाच्या ३०६ स्टार्टअपमधून निवड
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः येथील सिरी एज्युटेक या स्टार्टअपने भारत क्रोएशिया स्टार्टअप चॅलेंज २०२२ जिंकले आहे. ‘सिरी’ची ‘डिसेन्ट वर्क फॉर इकॉनोमिक ग्रोथ''साठी सर्वोत्कृष्ट प्रॉब्लेम स्टेटमेन्ट श्रेणीमध्ये निवड झाली आहे. भारत आणि क्रोएशियामधील ३०६ स्टार्टअप सहभागींमधून एकूण १२ स्टार्टअप्सची निवड झाली आहे.
‘ज्याच्याकडे स्किल्स त्यालाच नोकरीची संधी’ या तत्त्वावर आधारित ‘सिरी’ हा हेल्थकेअर आणि फार्मा सेक्टरमधील भारतातील पहिला स्कील डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये कौशल्य विकास इंडस्ट्री एक्स्पर्टकडून कोर्सेस, उद्योजकता, ॲप्टिट्यूड आणि मॉक टेस्ट, वेबिनार, पॉडकास्ट, व्हिडिओवर आधारित रिझुमे आणि जॉब पोर्टल या गोष्टी उपलब्ध आहेत.
भारत सरकार, क्रोएशियन दूतावास, स्टार्टअप इंडिया, इन्फोबिप, कोन्कार हेक्सजिन यांच्या सहकार्यानि क्रोएशिया एजन्सी फॉर स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायझेस, इनोव्हेशन अँड इन्व्हेस्टमेंट्सने हे स्टार्टअप चॅलेंज आयोजित केले होते. क्रोएशिया सध्या ६०० पेक्षा अधिक स्टार्टअप नोंदणीकृत असलेल्या टॉप ५० देशांपैकी ३७ व्या क्रमांकावर आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम असल्याने, भारत-क्रोएशिया स्टार्टअप ब्रीज तयार करण्यासाठी क्रोएशियन सरकारसोबत सहयोग केला आहे. भारत क्रोएशिया स्टार्टअप ब्रीजमध्ये स्किल डेव्हलपमेंट, स्वच्छ पाणी व स्वच्छता, आणि निर्वासितांच्या जीवनाची पुनर्रचना हया तीन थिम्सवर आधारित स्टार्टअप्सकडून आवेदने मागवली होती. चौदा जूनला पुरस्कार वितरण सोहळा झाला. इन्व्हेस्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक बागला, क्रोएशियातील भारतीय राजदूत राजकुमार श्रीवास्तव, अँटे जांको बोबेटको यांच्या हस्ते झाला. सिरी एज्युटेकचे संस्थापक सचिन कुंभोजे आणि अंजोरी परांडेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. दहा हजार क्रोएशियन कोना (एक लाख सहा हजार रूपये), इन्फोबिपद्वारे दहा हजार डॉलर क्रेडिट्स आणि हेक्झिन कडून दोन हजार डॉलरचे स्टार्टअप स्केल-अप प्रोग्राम यांचा पुरस्कारामध्ये समावेश आहे.
कोरोनाची संधी
डेटा मायनिंग आणि क्लाऊड टेक्नॉलॉजीवर आधारित या प्लॅटफॉर्मद्वारे एका बाजूला नोकरी शोधणारे आणि दुसऱ्या बाजूला नोकरी देणारे यांना एकत्र आणले आहे. कोविड काळात संधीचं सोने करून फक्त १८ महिन्यांत उभ्या झालेल्या या स्टार्टअपने आता आंतराष्ट्रीय स्तरावर मोहोर उमटवली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68323 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..