
जिल्हा परिषदेतच पाणी टंचाई
जिल्हा परिषदेतच पाणीटंचाई
---
चौथ्या मजल्याच्या कामाचा परिणाम; खातेप्रमुखांच्या कार्यालयातही ठणठणाट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी बैठकांचा धडाका सुरू आहे. मात्र, खुद्द जिल्हा परिषदेच्या मुख्यालयालाच पाणी पाजण्याची वेळ आली. चौथ्या मजल्याचे बांधकाम सुरू झाल्यापासून इमारतीची झालेली तोडफोड, गळती आणि त्यावर आता अधिकारी, कर्मचाऱ्यांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. बांधकाम विभागाचे प्रमुख असणारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, जिल्ह्याचा लेखाजोखा ठेवणारे मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही. टी. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांच्या दालनात बाहेरून पाणी आणावे लागत आहे. टंचाईमुळे दालनाबरोबरच सर्व मजल्यांवरील स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली.
वर्षभर चौथ्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे. यासाठी मोठी तोडफोड केली. त्यामुळे स्लॅबला गळती लागली आहे. अनेक कार्यालयांतील फर्निचर या गळतीने खराब झाले. अधिकारी, कर्मचारी दालनात गळतीचे पाणी साठविण्यासाठी बादल्या ठेवल्या आहेत. हे काम करीत असताना पाण्याच्या पाइपलाईनची मोडतोड झाली. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला आहे. अधिकाऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. अधिकाऱ्यांच्या दालनासाठी विकत पाणी आणावे लागत आहे; तर कर्मचारी घरातूनच पाणी घेऊन येतात. दुपारी पाणी संपले तर त्यांनाही पाण्याची खरेदी करावी लागत आहे.
एका बाजूला जल जीवनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर बैठका सुरू आहेत. मात्र, मुख्यालयातील टंचाई व स्वच्छतेसाठीही अशी बैठक घ्यावी, अशी मागणी कर्मचारी करीत आहेत. आणखी दोन, चार दिवस अशीच स्थिती राहिली तर स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीमुळे कर्मचाऱ्यांना काम करणेही अवघड होईल.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68722 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..