
चळवळीने ओलांडली राज्याची सीमा
29859
महादेव कोरे
चळवळीने ओलांडली
राज्याची सीमा
शेंडूरमध्ये झाले नेत्रदान; कोरे कुटुंबीयांचा आदर्शवत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : गडहिंग्लज व आजरा तालुक्यात सुरू असलेल्या मरणोत्तर नेत्रदान चळवळीने आज राज्याची सीमा ओलांडली. रासाई शेंडूर (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथील महादेव विठोबा कोरे (वय ६२) यांचे निधन झाले. कोरे कुटुंबीयांनी त्यांच्या मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्शवत निर्णय घेतला. चळवळीतील हे ७२ वे नेत्रदान ठरले.
अत्याळ येथे दहा वर्षांपूर्वी नेत्रदान चळवळीची सुरवात झाली. आज कर्नाटकातील शेंडूर येथे झालेल्या पहिल्याच मरणोत्तर नेत्रदानाच्या माध्यमातून चळवळीने महाराष्ट्र राज्याची सीमा ओलांडली. दरम्यान, महादेव कोरे यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. निपाणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. नेत्रदान चळवळीतील कार्यकर्ते प्रा. सुभाष कोरे यांचे ते मेहुणे होत. प्रा. कोरे यांनी कुटुंबीयांना नेत्रदानाबाबतची माहिती दिली. प्रबोधनानंतर कोरे कुटुंबीयांनी महादेव यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यास परवानगी दिली. त्यानंतर येथील अंकुर आय बँक व नेत्ररोपण केंद्राच्या पथकाला पाचारण करण्यात आले. डॉक्टरांच्या या पथकाने शेंडूर येथील कोरे कुटुंबीयांच्या घरी जाऊन नेत्रगोल घेण्याची प्रक्रिया पार पाडली. महादेव यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातू, दोन मुली असा परिवार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68768 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..