
गोडसाखर न्यायालय निकाल
58930
भाडेतत्त्वावर देण्याची याचिका फेटाळली
---
उच्च न्यायालयाचा आदेश; गोडसाखरप्रश्नी प्रशासकांना कार्यवाही करण्यास दिली मुभा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची (गोडसाखर) प्रशासकांनी घेतलेली सर्वसाधारण सभा बेकायदेशीर ठरवून निवडणुकीनंतरच कारखाना चालवायला देण्याच्या ठरावाची कार्यवाही व्हावी, या आशयाची सभासदांनी दाखल केलेली याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळली. पुढील हंगाम वेळेत सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासकांनी सुरू केलेली कार्यवाही कायम ठेवावी, असाही आदेश न्यायाधीशांनी दिल्याची माहिती कारखान्याचे प्रशासक अरुण काकडे यांनी दिली.
याबाबत माहिती अशी ः आर्थिक अडचणीतील गोडसाखर कारखाना भाडेतत्त्वाने चालविण्यास देण्यासाठी प्रशासक श्री. काकडे यांनी ११ जूनला विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती. त्या वेळी झालेल्या प्रचंड गोंधळात सभासदांनी हा विषय मंजूर केला; परंतु या विषयाला विरोध करणाऱ्या सभासदांचे मत विचारात घेतले नाही म्हणून चार सभासदांनी निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. काल (ता. १६) यावर न्यायालयात सुनावणी झाली. सर्वसाधारण सभेचा ठराव न्यायालयात सादर करावा व पुढील आदेशापर्यंत त्याची अंमलबजावणी करू नये, असा आदेश न्यायाधीशांनी दिला होता.
दरम्यान, आज लगेचच न्यायमूर्ती माधव जामदार व न्यायमूर्ती आर. डी. धनुका यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी पुन्हा झाली. निवडणूक कार्यक्रम सुरू असताना अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय प्रशासकांना घेता येणार नाही. त्यामुळे या सभेला स्थगिती देऊन निवडणुकीनंतर ठरावाची अंमलबजावणी व्हावी, असा युक्तिवाद सभासदांच्या वकिलांनी मांडला. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम सुरू असला तरी पुढील गळीत हंगामाची तयारी करताना सभेचा ठराव किती गरजेचा आहे, हंगाम वेळेत सुरू होण्याची निकड, शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप वेळेत होण्याची आवश्यकता यासंदर्भातची माहिती सरकार पक्षातर्फे न्यायाधीशांना देण्यात आली.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायमूर्तींनी सभासदांचा अर्ज फेटाळला. प्रशासकांची कार्यवाही योग्य असल्याचे मत नोंदवून ठरावानुसार पुढील हंगामाच्या तयारीची कार्यवाही सुरू ठेवण्यास मुभा दिल्याचे श्री. काकडे यांनी सांगितले. सरकारतर्फे अॅड. पी. जी. सावंत व अॅड. प्रशांत भावके यांनी, तर सभासदांतर्फे अॅड. शैलेंद्र कानेटकर यांनी युक्तिवाद मांडला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68903 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..