
बर्कीच्या विकासाला जिल्हा नियोजनची साथ
बर्कीच्या विकासाला ‘नियोजन’ची साथ
पालकमंत्री सतेज पाटील यांची ग्वाही; प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ग्रामदान मंडळ असलेल्या बर्कीचा ऐतिहासिक ठेवा जतन करणे गरजेचे आहे. त्यामुळेच गावाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळ सर्वतोपरी सहकार्य करेल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. तसेच पुढील आठवड्यात बर्कीच्या विकास आराखड्याबाबत बैठक घेण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत महाराष्ट्रातील २० गावे सहभागी झाली. यात पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव बर्की या गावाचा समावेश आहे. शाहूवाडी तालुक्यातील बर्की गाव तेथे असणाऱ्या धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र या गावाचा भूदान चळवळीशी काही संबंध आहे, याची अनेकांना कल्पना नव्हती. अगदी लोकप्रतिनिधींनाही याची माहिती नव्हती. ‘सकाळ’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गावाची माहिती संकलनास सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकार दिले. यानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गावच्या समस्यांबाबत बैठक घेत मदत करण्याची ग्वाही दिली.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही गावातील अडचणी जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले. जमिनींच्या मालकीबाबत असलेले नियम व त्यातील सुधारणांसाठी समितीचीही स्थापना केली. मात्र प्रत्यक्षात गावात असलेल्या विविध अडचणी मात्र आहे तशाच आहेत. रस्त्यांचा प्रश्न, गटर्स, शाळा दुरुस्ती, ग्रामपंचायत इमारत, धबधब्यामुळे येणारे पर्यटक व त्यांची व्यवस्था, पार्किंग व स्वच्छतागृह या प्रश्नांची निर्गत होणे आवश्यक होते. मात्र अपवाद वगळता हे प्रश्न जसेच्या तसे आहेत. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांची बर्कीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावर तत्काळ बैठक घेऊन निधीची तरतूद करण्याची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. पुढील आठवड्यात ही बैठक घेतली जाणार आहे.
कोटी सोडा रुपयाही नाही
‘सकाळ’मध्ये बर्कीच्या ऐतिहासिक वारशाबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार विनय कोरे यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. गावच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाने मदत करावी, अशी मागणी केली. यानंतर मंत्रालयात बैठकही झाली. यात बर्कीच्या विकासासाठी १ कोटी देण्याची घोषणा केली. आत्तापर्यंत रुपया दिलेला नाही. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्ंनी बर्कीस भेट दिल्यानंतर एक, दोन कामांना निधी दिला आहे; मात्र ग्रामविकास मंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे काय, असा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69037 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..