फादर्स डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फादर्स डे
फादर्स डे

फादर्स डे

sakal_logo
By

लोगो- जागतिक पिता दिन
----

पोरांसाठी धडपडणाऱ्या बापाची कहाणी...
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः मुलांनी चांगलं शिकून मोठं व्हावं, नोकरी व्यवसायात यश कमवून मुलांनी स्वतःबरोबरच आईवडिलांनाही सांभाळावं, अशा मनोदयातून मुलांसाठी बहुतेक बाप कष्‍ट करतात; मात्र नियतीच्या विचित्र फटकाऱ्यात उतारवयात मुलांना सांभाळण्याची वेळ बापावर आली. रोजच्या परिस्थितीशी झगडत संकटात सापडलेल्या मुलांना सावरणारे बाप... तर काहींना मूलच नसल्याने उतारवयात पोरगं दत्तक घेण्यासाठी धडपड सुरू झाली. उतारवयात पुत्र प्रेमाच्या शोधात धडपडणारे हे दुसरे बाप. अशा बापांच्या दुहेरी छटा हेलावून टाकत आहेत; मात्र परिस्थितीला तोंड देण्याची या बापांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे.

बाप म्हणून तेवढे केलेच पाहिजे
लांजा (जि. रत्नागिरी) येथून एक रुग्णवाहिका दवाखान्यात आली. ६३ वर्षांचे बापू दळवी खाली उतरले. स्ट्रेचरवर अर्धवट बेशुद्ध स्थितीतील त्यांच्या एकुलत्या ३७ वर्षांच्या मुलग्याला उपचारासाठी घेऊन आले. धावपळ थांबताच त्यांच्याकडून माहिती घेतली. दहा वर्षांपूर्वी पोरग्याला मेंदूत रक्तस्त्राव झाला. तेव्हापासून मुलाचा कंबरेखालचा भाग लुळा आहे. बापूची पत्नी शेती व घरकाम करते. बापू किराणा मालाचे दुकान सांभाळत मुलाची शुश्रूषा करतात. वेळोवेळी मुलावर उपचार झाले. फारसा फरक पडलेला नाही. तरीही बापूंनी जिद्ध सोडलेली नाही. पोरगा आज ना उद्या उभा राहावा यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा ते सल्ला घेतात, उपचारासाठी नेतात. कोणतीच हयगय करीत नाहीत. ‘माझं जीवन असेपर्यंत मी मुलासाठी प्रयत्न करीत राहणार. बाप म्हणून मला तेवढे केलेच पाहिजे,’ असा ठाम निर्धार बापूंनी व्यक्त केला.

पण पोराला तेवढं लवकर सोडवा...
रिक्षाचालक सुरेशराव हतबल होऊन बिंदू चौक कारागृहाजवळ घिरट्या मारत होते. फोनवर वकिलांशी काहीबाही बोलत होते. वकील मोजक्या शब्दांत समजूत काढत होता. ‘साहेब काही पण करा; पण पोराला तेवढं लवकर सोडवा...’ असे म्हणताना सुरेशरावांच्या डोळ्यांतून पाणी घळाघळा वाहत होतं.
कोणत्या तरी गुन्ह्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीतील मुलाला सोडवण्यासाठी सुरेशराव वकिलांशी सल्लामसलत करीत होते. ते म्हणाले की, आयुष्यात पहिल्यांदाच मी इथं आलोय. आत गेलेल्या व्यक्तीला भेटायचं कसं हेच माहिती नाही. मेहुण्याने वकील गाठून दिला. त्यांच्याशीच बोलणं आता झालं. माझ्या पोरग्याचं चुकलं असलं नसलं तरी त्याला सोडवण्यासाठी बाप म्हणून मलाच धडपड करावी लागेल. मी दिवसभर काय कष्‍ट करतोय, संसार कसा भागवतोय ते पोराला कुठे माहीत, असे सांगत त्यांनी घुसमटही व्यक्त केली.

मुलाला दत्तक घेण्याची इच्छा अधुरीच
एका सेवाभावी संस्थेत पंढरीनाथ गायकवाड मुलगा दत्तक घेण्यासाठी चौकशी करून आले. तेथे मूल दत्तक दिले जाते. त्या व्यक्तीची मुलाला सांभाळण्याची क्षमता संस्था तपासते. हे समजल्यावर पंढरीनाथ हतबल झाले. पंढरीनाथ शहरात एका उद्यानाजवळ आंबोळी विकतात. भाड्याच्या घरात राहतात. पत्नीचे दहा वर्षांपूर्वी निधन झालं. पोटची मुले नसल्‍याने ते एकाकी झाले. हाताने स्वयंपाक करून खातात. वयाची साठी ओलांडली आहे. उतारवयात एकाकीपणा भयावह वाटत आहे म्हणून मुलगा दत्तक घेणार होते; मात्र मुलांचा सांभाळ सुस्थितीत करू शकेन, याची शाश्वती देण्यासारखे पंढरीनाथांजवळ काहीच नाही याची जाणीव होताच मुलाला दत्तक घेऊन बाप होण्याची त्यांची इच्छा अधुरीच राहिल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

कोट
मुलांचा आत्मीयतीने सांभाळ करणारे अनेक बाप सर्वत्र आहेत. त्यातील वरील प्रातिनिधिक छटा आहेत. जागतिक पिता दिन साजरा करताना केवळ मुलाला सांभाळण्यासाठी बापाचीही धडपड काय असते हे मुलांनी समजून घेतले तरी मुलांना पित्याविषयीचा आदर भाव वाढू शकेल.
डॉ. अशोक पाटील, ज्येष्‍ठ नागरिक.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69142 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top