
नालेसफाई
30327
रस्त्यावरील पाणी रस्त्यावरच
गटारीची तोंडे बंद; राजारामपुरीतील स्थिती
कोल्हापूर, ता. १९ ः महापालिकेकडून मोठ्या नाल्यांतील कचरा, गाळ काढला जात असला तरी रस्त्यावरील पाणी आयआरबीच्या गटारीत जाण्यासाठीची तोंडे उघडी नसल्याने आज सकाळी झालेल्या तुरळक पावसाने राजारामपुरीच्या चौकात पाणी साठले. त्यामुळे या गटारीची तोंडे उघडी करून रस्त्यावरील पाणी त्यात वळवण्याची गरज ‘आम्हाला पूर नको’ अभियानाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
राजारामपुरी जनता बझार व शाहू मिल पोलिस चौकीसमोर आज सकाळी थोड्याशा पावसाने पाणी साचले. जर मोठा पाऊस सुरू झाला तर नक्कीच तिथे पाणी तुंबणार असा दावा कार्यकर्त्यांचा आहे. ताराराणी विद्यापीठाकडून रस्त्यावरून वाहत येणारे पाणी शेजारील गटारीत जातच नाही. ते थेट चौकात जमते. त्यामुळे एका कोपऱ्यावर पाणी साचले. ते पाणी जर ठिकठिकाणी गटारीत वळवले तर पाणी वाहणार नाही. तसेच शाहू मिल चौकीजवळही गटारीत पाणी न गेल्याने रस्त्यावर साचते. त्यासाठी आयआरबीच्या फुटपाथखाली असलेल्या गटारीला तोंडे करावी लागतील असे ॲड. बाबा इंदुलकर यांनी सांगितले. तसेच व्हिनस कॉर्नर, दाभोळकर चौक, ताराराणी चौक, सावित्रीबाई फुले रूग्णालय चौक, हॉकी स्टेडियमजवळच्या गटारींमध्ये रस्त्यावरील पाणी जाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे, हे गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने दाखवून दिले होते.
चौकट
परीख पुलाजवळ स्वच्छता
परीख पुलाजवळील गटारी तुंबल्याचे कार्यकर्त्यांनी दाखवून दिले होते. महापालिकेने तिथे स्वच्छता मोहीम राबवली. गटारीत साठलेला कचरा उचलला.
कोट
नाल्यावरील अनाधिकृत बांधकामे तसेच जे नाले मुजवले आहे, ते रिकामे करणे आवश्यक आहे. प्रशासनाचा अंकुश किंवा वचक नसल्यामुळे हे प्रश्न वाढत आहेत. त्यामुळे कामात बदल करणे आवश्यक आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.
- गणेश लाड, शिवाजी पेठ
कोट
वृंदावन अपार्टमेंटवरून येणाऱ्या नाल्याचे पाणी पावसानंतर आमच्या चार घरांच्या बेसमेंटमध्ये येते. पालिकेचे अधिकारी दोन वर्षे पाहणी करतात; पण कारवाई करत नाहीत. यावर्षी पहिल्या पावसातच बेसमेंटला पाणी आले. वरून येणाऱ्या पाण्याला रस्ता करून दिला तर ते जाऊ शकते. पसरलेले केंदाळ काढण्यासाठी जेसीबीची गरज आहे. आमच्याकडे तो येत नाही.
- परिसा घोंगडे, सानेगुरूजी परिसर
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69392 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..