
आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी प्रयत्न : मंत्री मुश्रीफ
कोल्हापूर - पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजारांच्या तसेच तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी ६ कोटी ७३ लाख २० हजारांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मुंबईत दिली.
पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आषाढी एकादशीनिमित्त पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेतला आहे, असे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
आषाढी एकादशीच्यानिमित्त पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून विविध संतांच्या पालख्या सोबत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते. यानुसार पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शासन निर्णय जारी केला आहे, असे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केलेल्या निधीच्या ५० टक्के निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून उपलब्ध करावयाचा आहे. हा निधी जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना मागणीनुसार उपलब्ध करून द्यायचा आहे. पुणे जिल्हा परिषदेला ८२ लाख रुपये, सातारा जिल्हा परिषदेला २० लाख २५ हजार रुपये तर सोलापूर जिल्हा परिषदेला १ कोटी ५७ लाख ५० हजारांचा निधी वितरित करण्यात येईल, असे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69490 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..