
महापालिकेच्या १२ कोटी लिटर पाण्याची चोरी
महापालिका
रोज १२ कोटी लिटर पाण्याची चोरी
महापालिकेला १०० कोटींचा वार्षिक तोटा; गळतीचे प्रमाणही अधिक
ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः महापालिका नदीतून दररोज २० कोटी लिटर पाणी उपसा करते. त्यातील ६ कोटी लिटर पाण्याचे बिलिंग होते. म्हणजे १४ कोटी लिटर पाण्याचा हिशेब लागत नाही. यातील २ कोटी लिटर पाणी गळती असे गृहीत धरले तरी १२ कोटी लिटर पाणी कुठे जाते. त्याचे बिलिंग होत नाही. म्हणजे या पाण्याची चोरी होते किंवा वाया जाते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक आणि मद्रास ‘आयआयटी’चे अभियंते सत्यजित जाधव यांनी अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत. त्यासाठी त्यांनी महापालिकेने नेमलेल्या ‘एसजीआय’ कंपनीचा २०१६-१७ मध्ये सादर केलेला अहवाल अभ्यासला आहे. ‘क्वांटिटिफिकेशन ऑफ लॉसेस फ्राँम द सिस्टिम’ असे या अहवालाचे नाव आहे.
श्री. जाधव सांगतात, शहरातील पाणी वितरणातील त्रुटी शोधण्यासाठी २०१६-१७ मध्ये एसजीआय कंपनीला नियुक्त केले होते. या कंपनीने याचा अहवाल महापालिकेला दिला. या अहवालाची प्रत माहितीच्या अधिकारात घेतली व त्याचा अभ्यास केला.
कोल्हापूरकर बिल भरतात त्याच्या जवळजवळ तिप्पट पाणी वाया अथवा चोरीला जाते. फेब्रुवारी २०१८ मध्ये एसजीआय कंपनीने याबाबत सर्व्हे करून तपशीलवार अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोल्हापुरात साधारण एक लाख पाण्याची कनेक्शन आहेत. पाण्याचे बिल दिवसेंदिवस वाढत जात आहे. ते आता महिना सरासरी ४०० रुपये झाले आहे. म्हणजे महिन्याला चार कोटी रुपये ५.८० कोटी लिटर पाणी देऊन दररोजच्या पाण्यासाठी महापालिका आपल्याकडून वसूल करते. दररोज १२ कोटी लिटर पाणी चोरी किंवा वाया गेल्यामुळे कोल्हापूरकरांना महिन्याला होणारा तोटा ८ ते १० कोटी आहे. ही पाण्याची गळती आणि चोरी थांबवली तर पाण्याचे बिल सरासरी २०० ते ३०० रुपये येईल. तसेच, जवळपासच्या काही खेड्यांना उपनगरांना पाणीपुरवठा करता येईल. दररोज १४ कोटी लिटर पाणी वाया किंवा चोरीला जाणे हा अक्षम्य गुन्हा आहे. वर्षाला १०० कोटी नुकसान होत आहे.
अहवालात म्हटले आहे
* शहराची लोकसंख्या साधारण साडेसहा लाख
* प्रत्येक नागरिकाला दररोज १३५ लिटर पाणी मिळणे अपेक्षित
* दररोज शहराला लागणारे पाणी ८.७७ कोटी लिटर होते
* घरगुती, औद्योगिक वापर व गळती धरून १० कोटी लिटर पाणी लागते
* महापालिका दररोज १९.८२ कोटी लिटर पाणी उचलते
* मागणीपेक्षा दुप्पट पाण्याचा उपसा
* गळतीचे प्रमाण २० टक्के धरले तर १५.८६ कोटी लिटर पाणी मिळायला हवे
* फक्त ५.८० कोटी लिटर पाणी उपलब्ध होते
* उरलेले १२ कोटी लिटर पाणी कुठे जातो हाच प्रश्न
-----------------------------------------------------------------------------------------------------
राधानगरी धरणामुळे कोल्हापूरला बारमाही पाणीपुरवठा होतो. ज्या पाण्यासाठी शाहू महाराजांनी आपली संपत्ती आणि जीवन पणाला लावले, तेच पाणी आपण चोरी किंवा वाया घालवत आहोत. हा कृतघ्नपणाच आहे.
- सत्यजित जाधव, अभियंते व अभ्यासक.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69700 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..