‘डिस्टींक्शन’ची बहर, ‘सायन्स’लाच लहर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डिस्टींक्शन’ची बहर, ‘सायन्स’लाच लहर
‘डिस्टींक्शन’ची बहर, ‘सायन्स’लाच लहर

‘डिस्टींक्शन’ची बहर, ‘सायन्स’लाच लहर

sakal_logo
By

‘डिस्टींक्शन’ची बहर,
‘सायन्स’लाच लहर
गडहिंग्लजमधील कल; टक्केवारी वाढल्याने विद्यार्थी-पालकांवर विज्ञानाची जादू कायम
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ : दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गडहिंग्लज तालुक्यातील ३ हजार ४०१ पैकी २४३६ विशेष प्राविण्य (डिस्टींक्शन) घेवून तर ८०१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. बेस्ट ऑफ फाईव्हच्या धोरणानुसार वाढलेल्या टक्केवारीमुळे अलीकडील काही वर्षापासून विज्ञान शाखेकडील कल वाढला आहे. यंदा तर विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणी घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पुन्हा सायन्सलाच बहर येण्याची चिन्हे आहेत.
पूर्वी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीतील विद्यार्थी संख्या हाताच्या बोटावर मोजायला लागायची. बेस्ट ऑफ फाईव्ह आणि शाळांतील गुणांचा विचार करता अलीकडील काही वर्षापासून निश्‍चितच अशा विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. परंतु, यंदाचे वर्ष अलीकडच्या काही वर्षापेक्षा वेगळे ठरले आहे. यंदा विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांवर नजर टाकल्यास अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने ही संख्या उच्चांकी आहे. प्रथम श्रेणी व विशेष प्राविण्यच्या बहुतांश विद्यार्थ्यांचा कल सायन्स शाखेकडे असतो.
यंदाही हाच कल असला तरी सायन्स शाखेतील प्रवेश क्षमतेच्या तुलनेत विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीतील संख्या दुप्पट आहे. यातील काही विद्यार्थ्यांची विभागणी ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये होवू शकते. मात्र शहरातील महाविद्यालयात शिकण्याचा ट्रेंड लक्षात घेता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी मोठ्या रांगा लागण्याची चिन्हे आहेत. सर्वांनाच सायन्समध्ये प्रवेश देणे यंदा आव्हानाचे ठरणार आहे. अलीकडील काही वर्षापासून सायन्स शाखेत प्रवेश घेण्यासाठीची स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थी व गुणवत्तेवर अन्याय होवू नये म्हणूनच गडहिंग्लजला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाली.
दहावी-बारावीनंतर पुढे काय, हा प्रश्‍न जेंव्हा येतो त्यावेळी निश्‍चितच पालकांची जबाबदारी वाढते. यंदाच्या दहावी निकालात वाढलेल्या टक्केवारीची कारणे शोधूनच आपल्या पाल्यातील गुण पहायचे की गुणवत्तेची क्षमता हे आधी पालकांनी ठरवणे आवश्यक आहे. आपलं नाणं किती खणखणीत आहे हे तपासून घेण्याची वेळ पालकांवर यंदा आली आहे. ‘''टक्केवारी जास्त आहे...घे सायन्सला’ ही मानसिकता बदलण्याचीही गरज आहे. पाल्यातील गुणवत्तेची क्षमता आणि त्याची इच्छा या गोष्टींना अधिक महत्व देवून पालकांना पाल्याच्या शैक्षणिक वाटचालीची दिशा निश्‍चित करावी लागणार आहे.

चौकट...
करिअरची अनेक द्वार खुले...
केवळ सायन्समधून शिकले तरच करिअर होते, हे फॅड आधी डोकीतून काढायला हवा. करिअरसाठी काही पारंपारिकसह व्यावसायिक अभ्यासक्रमाचे द्वार खुले आहेत. सायन्सकडील वाढता कल कला शाखेची धूळधाण उडविणारी ठरत आहे. कला, वाणिज्यचे शिक्षण घेत स्पर्धा परीक्षांसह इतर परीक्षांचीही तयारी करणे सोयीचे आहे. पॅरा मेडिकलमधील विविध टेक्नीकल कोर्स, हॉटेल मॅनेजमेंट, आयटीआयसह बीबीए, बीसीए, एमसीए आदी अनेक तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम खुणावत आहेत. पुस्तकी ज्ञानापेक्षा पाल्याला स्वावलंबी जीवन जगण्यासाठी काय उपयुक्त आहे, हे ओळखून त्याचा प्रवेश ठरवायला हवा.

दृष्टीक्षेपात दहावी निकाल...
- उत्तीर्ण विद्यार्थी : ३४०१
- विशेष प्राविण्य : २४३६
- प्रथम श्रेणी : ८०२
- सायन्सची प्रवेश क्षमता : १६४०
(केवळ शहरातील महाविद्यालये)
- तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालये : २५

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70440 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top